Join us

IND vs NZ : भारताला भारतात पराभूत करणं शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिलं - टीम साऊदी

IND vs NZ Test Series : न्यूझीलंडने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून २-० ने विजयी आघाडी घेतली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 20:04 IST

Open in App

tim southee news : बलाढ्य भारतीय संघाला त्यांच्याच घरात अस्मान दाखवून न्यूझीलंड क्रिकेट संघाने भल्या भल्यांना न जमलेली कामगिरी केली. मागील बारा वर्षांत टीम इंडिया प्रथमच आपल्या मायदेशात कसोटी मालिकेत पराभूत झाली. शनिवारी दुसरा कसोटी सामना जिंकून न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयामुळे साहजिकच किवी संघाचा आत्मविश्वास शिगेला पोहोचलाय. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंना साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच भारताला लाजिरवाण्या पराभवांचा सामना करावा लागला. या मालिकेतील अखेरचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर १ नोव्हेंबरपासून खेळवला जाईल. शेवटच्या सामन्यापूर्वी किवी संघाचा प्रमुख गोलंदाज टीम साऊदीने 'क्रिकबज'शी बोलताना एक मोठे विधान केले. 

न्यूझीलंडने भारताला पराभूत करुन इतर संघांना एक संदेश दिला आहे. आम्ही भारतात जाऊन टीम इंडियाला पराभूत केल्यामुळे इतरही संघ भारताला त्यांच्याच घरात जाऊन पराभूत करू शकतात हे दाखवून दिले आहे, असे न्यूझीलंडचा खेळाडू टीम साऊदीने म्हटले. एकूणच टीम इंडियाला त्यांच्या मायदेशात हरवणे शक्य असल्याचे साऊदीने नमूद केले. 

न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना बलाढ्य भारताला प्रथमच त्यांच्या घरात हरवले. पुणे कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला आणि पाहुण्या किवी संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. बंगळुरू आणि पुणे कसोटीतील पराभवासह भारत मोठ्या कालावधीनंतर मालिका जिंकण्यात अपयशी ठरला. मागील तब्बल २९५ महिन्यांमध्ये केवळ तीन संघांना भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकता आली आहे. याआधी ऑस्ट्रेलिया (२००४) आणि इंग्लंडने (२०१२) ही किमया साधली होती. आता या यादीत न्यूझीलंडच्या (२०२४) संघाचा समावेश झाला आहे. न्यूझीलंडच्या संघाने ६९ वर्षांनंतर टीम इंडियाला भारतात कसोटी मालिकेत पराभूत केले. न्यूझीलंडच्या क्रिकेटसाठी हा सोनेरी क्षण असून, दारुण पराभवामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या सेनेला लक्ष्य केले जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर किवी संघाने जोरदार पुनरागमन केले आणि अव्वल स्थानी असलेल्या भारताला पराभवाची धूळ चारली.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघ