Virat Kohli Run Out by Matt Henry with direct hit Watch Video : भारताचा स्टार बॅटर विराट कोहली हा टीम इंडियातील चपळ आणि एकदम उत्साही कार्यकर्ता आहे. फिल्डिंग आणि 'रनिंग बिटवीन द विकेट्स'च्या बाबतीत त्यााला तोडच नाही. पण न्यूझीलंड विरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यात त्याचा अति उत्साह टीम इंडियाला संकटाच्या खाईत घेऊन जाणारा ठरला आहे.
विराटनं रन आउटच्या रुपात फेकली आपली विकेट
भारतीय संघानं दोन विकेट्स गमावल्यावर जोखीम नको या उद्देशाने मोहम्मद सिराजला नाईट वॉचमनच्या रुपात पाठवण्यात आले होते. तो आल्या पावली माघारी फिरल्यामुळे विराट कोहलीला मैदानात यावे लागले. अन् शेवटी जे नको होतं तेच घडलं. दिवसाअखेर किंग कोहलीच्या रुपात टीम इंडियाला 'विराट' धक्का बसला. कोहलीनं रन आउटच्या रुपात विकेट फेकली.
मॅट हेन्रीनं डायरेक्ट थ्रोसह संघाला मिळवून दिलं 'विराट' यश
भारताच्या पहिल्या डावातील १९ व्या षटकात रचिन रविंद्रच्या तिसऱ्या चेंडूवर विराट कोहलीनं हलक्या हाताने मिड ऑनच्या दिशेन फटका मारला. हा फटका मारल्यानंतर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न त्याने केला. पण मॅट हेन्रीनं चपळाईनं चेंडूवर येत डायरेक्ट थ्रो मारत किंग कोहलीचा डाव हाणून पाडला. कोहलीला ६ चेंडूत ४ धावा काढून त्याला पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला.
मैदानात तग धरण्यापेक्षा गडबडीनं धाव काढणं पडलं महागात
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीला लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. ५ डावात त्याच्या खात्यात फक्त ९२ धावा जमा आहेत. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत तरी तो संघासाठी उपयुक्त कामगिरी करेल, अशी चाहत्यांना आस होती. पण विराट कोहली यावेळीही फेल ठरला. पहिल्या तीन विकेट्स लवकर गमावल्यानंतर मैदानात तग धरून वेळ काढण्यापेक्षा धाव काढण्यावर त्याने भर दिला अन् तो फसला. त्याच्या या निर्णयामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण त्याच्या रुपात भारतीय संघाने ८६ धावांवर चौथी विकेट गमावली.