दुबईच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्ध रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात रोहित शर्मानं आपल्या फलंदाजीतील हिट शो दाखवला. पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर त्याने षटकार मारत संघाचं आणि आपलं खाते उघडले. या सामन्यात आक्रमक अंदाजात फलंदाजी करताना रोहित शर्मानं आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये पहिली फिफ्टची झळकावली. त्याने ४१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नवव्या फायनलमध्ये आली पहिली हाफ सेंच्युरी
भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल गाठल्यावर रोहित शर्माच्या नावे कॅप्टन्सीचा एक खास रेकॉर्ड जमा झाला होता. आयसीसीच्या सर्व स्पर्धेत संघाला फायनलमध्ये नेणारा तो क्रिकेट जगतातील एकमेव कर्णधार आहे. पण त्याच्या भात्यातून फायनलमध्ये मोठी खेळी कधीच पाहायला मिळाली नव्हती. पण अखेर त्याने हा कोरा रकानाही भरला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या फायनल लढतीत धावांचा पाठलाग करताना आक्रमक अंदाजात खेळत त्याने अर्धशतकी डाव खेळला. आयसीसीच्या नवव्या फायनलमध्ये त्याच्या भात्यातून ही खेळी आली.
याआधी २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळलेली ४७ धावांची खेळी होती सर्वोच्च
आतार्यंतच्या आपल्या १८ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत रोहित शर्मानं ९ वेळा फायनल खेळताना तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. यंदाच्या हंगामातील चॅम्पियन्स ट्रॉफीसह तो खास चौकार मारण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरला. यासाठी त्याने दमदार खेळीही केली. याआधी २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये त्याच्या भात्यातून ३१ चेंडूत ४७ धावांची खेळी आली होती. ही त्याची आतापर्यंत खेळलेल्या आयसीसी फायनलमधील सर्वोच्च खेळी होती. पण आता त्याच्या नावे अर्धशतक जमा झाले आहे. या अर्धशतकासह त्याने मॅचही टीम इंडियाच्या बाजूनं सेट केलीये.