Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास

न्यूझीलंडनं रचलेल्या ऐतिहासिक स्क्रिप्टमुळे मायदेशात टीम इंडियाच्या मालिका विजयाचा सिलसिला संपुष्टात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 15:59 IST

Open in App

टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने मिचेल सँटनरच्या सर्वोत्तम खेळीच्या जोरावर पुण्याचं मैदान मारत इतिहास रचला. ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेत किवी संघाने मालिका भारतीय मैदानात कसोटी मालिका जिंकण्याच स्वप्न साकार केले आहे. १९५५ पासून पहिली कसोटी मालिका जिंकण्याची त्यांची धडपड पुण्याच्या मैदानात संपली. श्रीलंकेच्या मैदानात मार खाऊन आलेल्या किवींनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत भारतीय मैदानात ऐतिहासिक कामगिरीसह मालिका जिंकून दाखवलीये. 

टीम इंडियाच्या विक्रमी  मालिका विजयाचा सिलसिला झाला ब्रेक

न्यूझीलंडनं रचलेल्या ऐतिहासिक स्क्रिप्टमुळे मायदेशात टीम इंडियाच्या मालिका विजयाचा सिलसिला संपुष्टात आला. याआधी २०१२ मध्ये टीम इंडियाने घरच्या मैदानात मालिका गमावली होती. त्यानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावली नव्हती. सलग १८ मालिका जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावे होता. पण पाहुण्या न्यूझीलंडनं भारतीय संघाचा विजयी रथ रोखत नवा इतिहास रचला आहे.    

भारतीय 'शेर' सँटनरसमोर 'ढेर'; ऐतिहासिक विजयात या फिरकीपटूचा सिंहाचा वाटा

बंगळुरुच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजयासह न्यूझीलंडच्या संघाने या मालिकेची दमदार सुरुवात केली. फिरकीसाठी अनुकूल असलेल्या पुण्याच्या खेळपट्टीवर टीम इंडिया न्यूझीलंडची गिरकी घेत मालिकेत बरोबरी साधेल, अशी अपेक्षा होती. पण फिरकीचा सर्वोत्तम सामना करण्याची क्षमता असणाऱ्या भारतीय संघातील ताफ्यातील फलंदाजांना मिचेल सँटनरच्या फिरकीच मॅजिक काही समजलं नाही. मिचेल सँटनरन दोन्ही डावात पंजा मारत टीम इंडियाला घायाळ करत संघाच्या ऐतिहासिक विजयात सिंहाचा वाटा उचलला.  

तिसऱ्या दिवशीच खेळ खल्लास;  य़शस्वी सोडला तर टीम इंडियाकडून एकालाही दाखवता आला नाही दम

सलामीवीर  ड्वेन कॉन्वे याने पहिल्या डावात १४१ चेंडूत ७६ धावांची मोलाची खेळी केली. त्याच्याशिवाय रचिन रवींद्रच्या भात्यातूनही १०५ चेंडूत ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी आली. सँटनरनं या डावात ३३ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या बाजूला पहिल्या डावात भारतीय संघाची अवस्था एकदमच बिगट होती. जाडेजाच्या ३८ धावा आणि शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी केलेल्या प्रत्येकी ३०-३० धावा वगळता अन्य कोणत्याही खेळाडूला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी भारताचा पहिला डाव अवघ्या १५६ धावांत आटोपला होता. पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी मिळाल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने दुसऱ्या डावात २५५ धावा करत टीम  इंडियासमोर ३५९ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करतानाही यशस्वी जैस्वालच्या भात्यातून आलेली ७७ धावांची खेळी आणि जाडेजाने केलेल्या ४२ धावा  वगळता अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाचा न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही. त्यामुळे भारताचा डाव २४५ धावांत आटोपला. न्यूझीलंडच्या संघाने तिसऱ्या दिवशीच टीम इंडियाचा डाव खल्लास करत  ११३ धावांनी पुण्याचं मैदान मारत ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड