India vs New Zealand Champions Trophy Record : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील लढतीची जोरदार चर्चा रंगली. गेल्या काही वर्षांपासून पाक विरुद्धच्या लढतीत भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. टीम इंडियाने तो सिलसिला कायम ठेवत पाकला धोबीपछाड दिली. भारत-पाक यांच्यातील मॅचचा मोहोल तापला अन् त्याचा निकालही प्रत्येक भारतीयाच्या मनाजोगा लागला. पण आता भारतीय संघाची खरी परीक्षा आहे. कारण आयसीसी स्पर्धेत जो संघ सातत्याने भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला आहे त्या न्यूझीलंडचे चॅलेंज भारत कसे परतवून लावणार ते पाहण्याजोगे असेल. भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामना हा सेमीच्या दृष्टीने ग्रुपमध्ये टॉपर कोण ते ठरवणारा आहेच. पण त्यासोबतच यंदाच्या हंगामात चॅम्पियन होण्यासाठी भारतीय संघ किती मजबूत आहे तेही या सामन्यात स्पष्ट होईल. एवढेच नाही तर भारतीय संघाला २५ वर्षांचा बदला घेण्याचे चॅलेंजही आहे. काय आहे ती २५ वर्षांपूर्वीची गोष्ट तेच आपण जाणून घेणार आहोत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कधी अन् कुठं रंगणार भारत-न्यूझीलंड यांच्यातील ताकदीची लढत?
भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामना म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीतील शक्तीप्रदर्शनच. दोन्ही संघा आपापली ताकद आजमवण्यासह ग्रुपमध्ये टॉपला राहण्याच्या इराद्याने २ मार्चला एकमेकांसमोर येतील. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात रंगणारा हा सामना जिंकेल, तो ग्रुपमध्ये टॉपला जाईल. सेमी फायनलमध्ये त्या संघाची लढत ग्रुप 'ब' दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाशी होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकदाच पाहायला मिळालाय दोन संघातील सामना?
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात एकदाच भारत-न्यूझीलंड यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. २००० च्या हंगामात ही लढत रंगली होती. त्यावेळी न्यूझीलंडच्या संघानं भारतीय संघाला ४ विकेट राखून पराभूत केले होते. त्यावेळी भारतीय संघाची कॅप्टन्सी करणाऱ्या सौरव गांगुलीनं १३० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ११७ धावांची दमदार शतकी खेळी केली होती. एवढेच नाही तर सचिन तेंडुलकरच्या भात्यातून १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६९ धावांची दममदार खेळी पाहायला मिळाली होती. पण भारतीय संघानं ठेवलेल्या २६४ धावांचा पाठलाग करून न्यूझीलंडच्या संघानं भारतीय संघाला स्पर्धेबाहेर केले होते. न्यूझीलंडकडून क्रिस क्रेन्सनं नाबाद शतकी खेळी केली होती. याशिवाय क्रिस हॅरिसच्या भात्यातून ४६ धावांची खेळी आली होती.
तर या दोन्ही संघातच रंगू शकते फायनल
'अ' गटातून भारत-न्यूझीलंड या दोन संघांनी सेमीत प्रवेश केला आहे. यंदाच्या हंगामातील जेतेपदाच्या शर्यतीत हे दोन्ही संघ आघाडीवर आहेत. जर सेमी फायनलमध्ये दोन्ही संघांनी बाजी मारली तर यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत या दोन्ही संघात फायनलची लढत पाहायला मिळू शकते.
Web Title: IND vs NZ In Champions Trophy 2025 Rohit Sharma Team India Big Challenge Agiant New Zealand Now Record And Stats
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.