Join us

Champions Trophy Final : "सुनो गौर से, दुनिया वालो"... टीम इंडियानं विक्रमी तिसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी

२०१३ नंतर भारतीय संघानं वनडे आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 21:55 IST

Open in App

रोहित शर्मानं शुबमन गिलसोबत रचलेला भक्कम पाया, मध्यफळीत श्रेयस अय्यरससह अक्षर पटेलनं केलेली उपयुक्त खेळी आणि लोकेश राहुलसह हार्दिक पांड्याचा तोरा याच्या जोरावर भारतीय संघानं फायनल बाजी मारलीये. लोकेश राहुल शेवटपर्यंत मैदानात राहिला आणि जड्डूनं चौकार मारत भारतीय संघाचा विजय पक्क केला. दुबईच्या मैदानात रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनल लढतीत किवींनी कडवी टक्कर दिली. पण मजबूत इराद्यासह मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं २५ वर्षांचा हिशोब चुकता करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. भारतीय संघानं विक्रमी तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकलीये. १२ वर्षानंतर भारतीय संघानं वनडे आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

विक्रमी तिसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी,  १२ वर्षांनी संपला वनडे आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ

याआधी भारतीय संघानं चार वेळा फायनल खेळली. २००० च्या हंगामात न्यूझीलंडनं भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यानंतर  २००२ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध या स्पर्धेचे संयुक्त जेतेपद पटकावल्याचे पाहायला मिळाले. २०१३ मध्ये भारतीय संघानं ही ट्रॉफी जिंकली होती. २०१७ च्या गत हंगामातही टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल गाठली. पण पाकिस्तानच्या संघासमोर टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पाचव्यांदा फायनलमध्ये पोहल्यावर टीम इंडियाने विक्रमी तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले आहे. सर्वाधिक वेळा ही ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम आता टीम इंडियाच्या नावे झाला आहे. सर्वाधिक ट्रॉफी जिंकणाऱ्या यादीत ऑस्ट्रेलियनं संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी २००६ आणि २००९ च्या हंगामात ही स्पर्धा जिंकली होती.      

धावांचा पाठलाग करताना रोहितची कडक फिफ्टी,  अय्यर-अक्षरच्या खेळीनंतर दिसला केएल राहुल अन् जड्डूचा जलवा

डॅरियल मिचेल ६३ (१०१) आणि मायकेल ब्रेसवेलच्या ५३ (४०) अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित ५० षटकात ७ बाद २५१ धावा करत टीम इंडियासमोर २५१ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीनं शतकी भागीदारी करत मजबूत पाया रचला.  शुबमन गिलच्या रुपात भारतीय संघानं १०५ धावांवर पहिली विकेट गमावली. त्याने ५० चेंडूत ३१ धावांची उपयुक्त खेळी केली. त्याची जागा घेण्यासाठी आलेला विराट कोहली अवघ्या एका धावेवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा ८३ चेंडूत ७६ धावांवर तंबूत परतला. मध्यफळीत श्रेयस अय्यर ४८ (६२), अक्षर पटेल  २९(४०) आणि हार्दिक पांड्यानं १ ८(१८) धावांच्या उपयुक्त खेळीसह संघाला विजयाच्या जवळ नेले. लोकेश राहुल ३३ धावा करून ३४ धावांवर नाबाद राहिला आणि विजय चौकार खेचणाऱ्या जडेजानं ६ चेंडूत नाबाद ९ धावांची खेळी करत टीम इंडियाच्या विक्रमी विजयात मोलाचा वाटा उचलला.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतीय क्रिकेट संघ