माऊंट मोनगानुई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-20 सामना आज खेळवण्यात येत आहे. या लढतीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. दरम्यान, या लढतीसाठी भारतीय संघात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. विराट कोहलीने विश्रांती घेतली असून, विराटऐवजी रोहित शर्मा आज भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.
चौथ्या सामन्यात विश्रांती घेणाऱ्या रोहित शर्माने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. आजच्या लढतीसाठी भारतीय संघात केवळ एकमेव फेरबदल करण्यात आला आहे. तर संजू सॅमसन आणि नवदीप सैनी यांना संघात कायम ठेवण्यात आले आहे.
गेल्या दोन सामन्यांत पराभवाच्या उंबरठ्यावर असताना विजय नोंदविणारा भारतीय संघ पाचव्या व अखेरच्या टी-२० सामन्यात आज, रविवारी यजमान न्यूझीलंडला ५-० ने क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडने तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्याच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेत कधीच सर्व सामने गमावलेले नाही.
२००५ मध्ये त्यांना मायदेशात द्विपक्षीय टी-२० मालिकेत केवळ एकदा सर्व सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. फेब्रुवारी २००८ मध्ये इंग्लंडने त्यांना २-० ने पराभूत केले होते. या मालिकेत ५-० ने विजय मिळविला, तर भारतीय संघ टी-२० मानांकनामध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर पाचव्या स्थानावर येईल.