Join us

'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)

वॉशिंग्टन सुंदरनं दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्यांदा केली रचिन रविंद्रची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 12:07 IST

Open in App

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यानं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यातही आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना मुंबईच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंड संघाला डेवॉन कॉन्वेच्या रुपात आकाश दीपनं पहिला धक्का दिला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर पिक्चरमध्ये आला. 

आधी सेट झालेल्या टॉम लेथमची घेतली विकेट

वॉशिंग्टन सुंदरनं आपल्या वैयक्तिक तिसऱ्या षटकात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमच्या रुपात भारतीय संघाला महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली. पहिली विकेट लवकर पडल्यावर टॉम लॅथम संघाच्या डावाला आकार देण्याचा अगदी उत्तम प्रयत्न करत होता. पण संघाच्या डावातील १६ व्या षटकात वॉशिंग्टननं एका सुंदर चेंडुवर त्याला चकवा दिला. वॉशिंग्टनचा चेंडू पिच झाल्यावर त्रिफळा कधी अन् कसा उडला ते टॉम लॅथमला  कळलंही नाही. ४४ चेंडूत २८ धावा करून तंबूत परतला. 

मग रचिन रविंद्रची तिसऱ्यांदा केली शिकार

वॉशिंग्ट सुंदर एवढ्यावरच थांबला नाही. आपल्या सहाव्या षटकात त्याने टॉम लॅथमची जागा घेण्यासाठी आलेल्या रचिन रवींद्रलाही  स्वस्तात माघारी धाडले. दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्यांदा त्याने न्यूझीलंडच्या स्टार बॅटरला आपल्यासमोर गुडघे टेकायला लावले. याआधी पुण्याच्या मैदानात दोन्ही डावात त्याने रचिन रविंद्रची विकेट घेतली होती. रचिन १२ चेंडूचा सामना करून अवघ्या ४ धावांवर बोल्ड झाला. त्यानंतर  त्याच्या चेहऱ्यावरील भाव बघण्याजोगे होते. वॉशिंग्टनच्या सुंदरनं अगदी टॉम लॅमला जसे फसवले तसेच रचिनलाही आपल्या जाळ्यात अडकवले. दोन्ही विकेट्स अगदी कॉपी पेस्ट स्टाईलमध्ये काढल्यासारख्या होत्या.  

डावखुऱ्या फलंदाजांना रोखण्यासाठी टीम इंडियात आला अन् तो प्लान यशस्वीही ठरवला

न्यूझीलंडच्या डावखुऱ्या फलंदाजांना रोखण्याच्या उद्देशानेच पहिल्या कसोटी सामन्यानंतर वॉशिंग्टन सुंदरची अचानक टीम इंडियात एन्ट्री झाली होती. ज्यासाठी त्याच्यावर डाव खेळला गेला तो या युवा गोलंदाजानं यशस्वी ठरवला आहे. पुण्याच्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरनं ११ विकेट्स घेतल्या होत्या. आता मुंबई कसोटी सामन्यातही त्याने अपेक्षित कामगिरी करुन दाखवत न्यूझीलंडच्या आघाडीच्या फलंदाजीला सुरुंग लावला आहे. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघवॉशिंग्टन सुंदरन्यूझीलंड