Join us

IND vs NZ : टीम इंडियाची 'कडू' दिवाळी; Rishabh Pant ची लक्षवेधी पोस्ट, म्हणाला, "जीवन म्हणजे..."

IND vs NZ 3rd Test : भारताला तिसऱ्या कसोटी सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 19:32 IST

Open in App

rishabh pant news : बंगळुरू, पुणे आणि मुंबई या तीनही कसोटी सामन्यांमध्ये यजमान भारताला पराभवाचा सामना करावा लागला.  भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने तीन सामन्यांची कसोटी मालिका ३-० ने खिशात घातली. या मालिकेतील अखेरचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. ऐन दिवाळीच्या सुट्टीत क्रिकेटच्या पंढरीत कसोटी क्रिकेट परतल्याने मुंबईकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. त्यामुळे टीम इंडिया विजयासह भारतीय चाहत्यांना दिवाळी भेट देईल अशी चाहत्यांना आशा होती. पण, तिसऱ्या सामन्यातही यजमानांच्या पदरी निराशा पडली. भारताकडून यष्टीरक्षक रिषभ पंतने एकतर्फी झुंज दिली मात्र त्यालाही आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही. भारताच्या पराभवानंतर रिषभ पंतने सोशल मीडियावर एक पोस्ट करुन सर्वांचे लक्ष लागले.  

रिषभ पंतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवत म्हटले की, जीवन म्हणजे एखाद्या मालिकेचा हंगाम आहे. जेव्हा तुम्ही खचता, कोसळता तेव्हा हे लक्षात ठेवायचे की, नैसर्गिकरित्या चांगल्या गोष्टी घडू लागतात. त्यामुळे तुम्ही अव्वल स्थान गाठण्यासाठी असे प्रयत्न करत राहा की, पराभवालादेखील लाज वाटेल.

दरम्यान, भारतीय संघाचा मुंबईच्या वानखेडे मैदानावर न्यूझीलंडने २५ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारताला ३-० अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभूत केले. घरच्या मैदानावर भारताची इतकी वाईट अवस्था पहिल्यांदाच झाल्याने चाहते संतप्त आहेत. भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, एखाद्या कसोटी सामन्यात किंवा मालिकेत झालेली हार पचवणे ही सोपी गोष्ट नाही. आम्हाला उत्तम क्रिकेट खेळणे जमले नाही हे मी मान्य करतो. न्यूझीलंड आमच्याविरुद्ध पूर्ण मालिकेत चांगली खेळली. आम्ही खूप चुका केल्या. पहिल्या दोनही सामन्यांमध्ये पहिल्या डावात आम्ही फारशा धावा करू शकलो नाही. या सामन्यात आम्हाला पहिल्या डावात आम्हाला २८ धावांची आघाडी मिळाली होती. आज मिळालेले आव्हान पार होण्यासारखे होते, पण आम्ही सांघिक कामगिरीत कमी पडलो. 

टॅग्स :रिषभ पंतभारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघ