Shreyas Iyer, IND vs NZ 3rd ODI: भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या तिसऱ्या वन डे सामन्यात संघाची सुरूवात खराब झाली. नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. संजू सॅमसनला पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतरही संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी संघ व्यवस्थापनावर ताशेरे ओढले. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला श्रेयस अय्यर दमदार फलंदाजी करू लागला होता, पण एका खराब फटक्याने त्याचा घात केला.
सलामीसाठी उतरलेल्या शुबमन गिल आणि शिखर धवनने ३९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर गिल केवळ १३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी डाव सावरण्यास सुरूवात केली. शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्यात भागीदारी होण्यास सुरूवात झाली होती. त्याच वेळी धवन माघारी परतला. तसे असले तरी श्रेयस अय्यरने चांगली फलंदाजी केली. तो हळूहळू आपली खेळी रंगवत होता. पण रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव दोघेही उसळत्या चेंडूवर फटका मारत बाद झाले. त्यानंतर डावाचा रागरंगच बदलला. संयमी खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरने फटकेबाजीचा पर्याय स्वीकारला पण त्याच फटक्याने त्याचा घात केला. त्यामुळे केवळ एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले.
श्रेयस अय्यरने एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. त्याने ५९ चेंडूंचा सामना केला आणि ८ चौकारांसह ४९ धावा केल्या. पण त्याला अनपेक्षित धावगती मिळवता आली नाही. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो माघारी परतला.