India vs New Zealand, 2nd T20I Live : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर भारताने न्यूझीलंडला ९९ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांचीही कोंडी झाली होती. न्यूझीलंडने १०० धावांच्या लक्ष्यासाठी भारताला अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करण्यास भाग पाडले होते.
वॉशिंग्टन सुंदरने स्वतःची विकेट फेकून सूर्यकुमार यादवला जीवदान दिले; तरीही SKY त्याच्यावर भडकला
भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना न्यूझीलंडच्या धावगतीवर वेसण घातले. युझवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला. युझवेंद्र चहलने आज भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक ९१ विकेट्स घेत भुवनेश्वर कुमारचा ( ९०) विक्रम मोडला. युझवेंद्र, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पांड्या व दीपक हुडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अर्शदीप सिंगने दोन विकेट्स घेतल्या. न्यूझींलडचा कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक १९*धावा केल्या. मार्क चॅम्पमन ( १४) व मायकेल ब्रेसवेल ( १४) यांनी संघर्ष केला. दीपक हुडा ( १-१७) व कुलदीप ( १-१७) यांनी चार षटकांत किवींना जखडून ठेवले. न्यूझीलंडला ९९ धावाच करता आल्या.
शुभमन गिल व इशान किशन यांनी सावध सुरूवात करताना १७ धावांची सलामी दिली. शुभमन ११ धावांवर बाद झाला. इशान व राहुल त्रिपाठी यांनी २८ धावांची भागीदारी केली. पण, इशान ( १९) रन आऊट झाला. इशानने दुसऱ्या रन साठी कॉल दिला, परंतु राहुलने त्याला माघारी जाण्यास सांगितले. तोपर्यंत ग्लेन फिलिप्सने वेगवान थ्रो केला अन् सँटनरे रन आऊट केले. किवी गोलंदाजही चांगला मारा करताना दिसले अन् भारताला धावांसाठी संघर्ष करावा लागला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात राहुल ( १३) इश सोढीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. वॉशिंग्टन सुंदरला फलंदाजीला पाठवले अन् त्याने सूर्याकुमार यादवसह डाव सावरला होता. पण, दोघांमधील ताळमेळ चुकले अन् वॉशिंग्टनला १० धावांवर रन आऊट होऊन माघारी जावे लागले.
१२ चेंडूंत १३ धावा भारताला करायच्या होत्या. लॉकी फर्ग्युसनने पहिले चार चेंडू चांगले टाकले, परंतु हार्दिकने पाचव्या चेंडूवर चौकार मारला. ४५ चेंडूनंतर भारताला चौकार मिळवता आला. भारताला ६ चेंडूंत ६ धावांची गरज होती. शेवटचे षटक टाकण्यासाठी टिकनर आला अन् हे त्याचे सामन्यातील पहिलेच षटक होते. तिसऱ्या चेंडूवर टिकनरकडून रिटर्न झेल सुटला. चौथ्या चेंडूवर हार्दिकला रन आऊट करण्याची संधी गमावली. भारताने १९.५ षटकांत ४ बाद १०१ धावा करून सामना जिंकला. सूर्या २६, तर हार्दिक १५ धावांवर नाबाद राहिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"