Shreyas Iyer Records, IND vs NZ: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, तो लवकरच विराट कोहली आणि शिखर धवन यांचा एक मोठा विक्रम मोडणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरने केवळ ३४ धावा केल्या, तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ३००० धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरेल.
नेमका विक्रम काय?
श्रेयस अय्यरने आतापर्यंत ७४ एकदिवसीय सामन्यांच्या ६८ पार्यांमध्ये २९६६ धावा केल्या आहेत. जर त्याने उद्याच्या (१४ जानेवारी) राजकोट येथील सामन्यात ३४ धावा केल्या, तर तो आपल्या ६९ व्या डावात ३००० धावांचा टप्पा गाठेल. यासह तो शिखर धवन (७२ डाव) आणि विराट कोहली (७५ डाव) यांना मागे टाकत भारतासाठी सर्वात वेगवान ३००० वनडे धावा पूर्ण करणारा फलंदाज बनेल.
व्हिव रिचर्ड्सच्या विक्रमाची बरोबरी
जर श्रेयसने ६९ व्या डावात हा पराक्रम केला, तर तो जागतिक स्तरावर वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज सर व्हिव रिचर्ड्स यांच्या विक्रमाची बरोबरी करेल. जगात सर्वात वेगवान ३००० धावा करण्याचा विक्रम हाशिम अमला (५७ डाव)च्या नावावर आहे. त्यानंतर बाबर आझम (६८ डाव) चा क्रमांक लागतो.
दुखापतीनंतर दमदार पुनरागमन
श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीनंतर घरच्या मैदानावर विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी खेळताना दमदार पुनरागमन केले. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत त्याने ४७ चेंडूत ४९ धावांची महत्त्वाची खेळी करून आपला फॉर्म सिद्ध केला. राजकोट येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात सर्वांचे लक्ष श्रेयस अय्यरच्या या विक्रमाकडे असेल.