IND vs NZ 2nd ODI Harshit Rana Clean Bowled Devon Conway : राजकोटच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. डेवॉन कॉन्वे आणि हेन्री निकोल्स याने पहिल्या पाच षटकात पाचपेक्षा अधिकच्या सरासरीसह धावफलकावर २२ धावा लावल्या. टीम इंडियाच्या तुलनेत न्यूझीलंडच्या संघाने चांगली सुरुवात केली. पण सहाव्या षटकात हर्षित राणानं सलामी जोडी फोडत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. हर्षित राणानं या मालिकेत सलग दुसऱ्यांदा डेवॉन कॉन्वेची शिकार केली. न्यूझीलंड बॅटरनं त्याच्याविरुद्ध २२ चेंडूत फक्त १८ धावाच केल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हर्षित राणाचं गिलसोबत खास सेलिब्रेशन अन् गंभीरची रिअॅक्शन
सहाव्या षटकात डेवॉन कॉन्वेनं १७ चेंडूत १६ धावांवर खेळत होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर तो झेलबादच्या स्वरुपात फसलाच होता, पण लोकेश राहुलला यासंधीच सोन करता आलं नाही. पण पुढच्याच चेंडूवर हर्षित राणा याने स्वबळाचा नारा देत अप्रतिम चेंडूवर कॉन्वेला त्रिफळाचित करत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिल्यावर हर्षित राणाने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. तो कर्णधार शुभमन गिलकडे पाहून इशारे करताना दिसला. एवढेच नाही तर त्याने विकेट घेतल्यावर कॅमरा टीम इंडियाचा कौच गौतम गंभीकडेही फिरला. त्यानेही युवा गोलंदाजाला दाद दिल्याचे पाहायला मिळाले.
गंभीरचा लाडका असल्याच्या कारणावरुन ट्रोल झाला, या पठ्ठ्यानं क्षमता दाखवून देत पुन्हा केली हवा
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा प्रशिक्षक गौतम गंभीरचा लाडका खेळाडू मानला जातो. अनेकदा तो ट्रोलही झाला आहे. या परिस्थितीत गंभीरने त्याला खंबीर पाठिंबा दिल्याचेही पाहायला मिळाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो गंभीरचा विश्वास सार्थ ठरवताना दिसत आहे. पहिल्या वनडे सामन्यातही त्याने कमालीच्या गोलंदाजीसह फलंदाजीत उपयुक्त खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. आता दुसऱ्या वनडेत संघाला पहिली विकेट मिळवून देत त्याने पुन्हा एकदा आपल्यातील धमक दाखवून दिली आहे.
सलामी जोडी फुटली अन् धावगती मंदावली
केएल राहुलच्या नाबाद शतकी खेळीसह शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात निर्धारित ५० षटकात २८४ धावा करत न्यूझीलंडसमोर २८५ धावांचे टार्गेट सेट केले आहे. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने चांगली सुरुवात केली. पण हर्षिण राणानं पहिला धक्का दिल्यावर न्यूझीलंडची धावगती मंदावली. पॉवर प्लेमध्ये न्यूझीलंडच्या संघाने १ विकेट्सच्या मोबदल्यात ३४ धावा केल्या होत्या. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर न्यूझीलंडने पॉवरप्लेमध्ये केलेली ही चौथ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ठरली.