India vs New Zealand 1st ODI Live : भारतीय संघ आगामी २०२३च्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे. शिखर धवन आणि शुबमन गिल या जोडीनं पहिल्याच वन डेत १२४ धावांची भागीदारी केली. भारतीय संघ वरचढ ठरतोय असे दिसत असताना ९ चेंडूंच्या फरकाने या दोघांनाही न्यूझीलंडने माघारी पाठवले. त्यानंतर रिषभ पंत ( Rishabh Pant) व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हेही अपयशी ठरले.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात अर्शदीप सिंग किंवा उम्रान मलिक दोघंही पदार्पण करत आहेत. शिखऱ धवन व शुबमन गिल ही जोडी सलामीला येणार आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर,
रिषभ पंत, सूर्याकुमार यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल व उम्रान मलिक अशी टीम आहे. शिखर आणि शुबमन या जोडीने भारताला १२४ धावांची दमदार सुरूवात करून दिली. या जोडीला २४व्या षटकात नजर लागली. ल्युकी फर्ग्युसनच्या षटकात पहिल्याच चेंडूवर शुबमन झेलबाद झाला. त्याने ६५ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारासह ५० धावा केल्या.
पाठोपाठ नवव्या चेंडूवर ( २४.३ ) धवन बाद झाला. टीम साऊदीने ही विकेट घेतली आणि भारताचे दोन्ही सलामीवीर १२४ धावांवर माघारी परतले. धवनने ७७ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने ७२ धावा केल्या. साऊदीची ही वन डे क्रिकेटमधील २०० वी विकेट ठरली. डॅनिएल व्हिटोरी ( २९७), कायले मिल्स ( २४०), ख्रिस हॅरीस ( २०३) व ख्रिस क्रेन्स ( २००) यांच्यानंतर किवींसाठी साऊदीने हा पराक्रम केला. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर भारताला पहिल्या चौकारासाठी ७ षटकांची वाट पाहावी लागली आणि तोही नशीबाने मिळाला. पण, पुढच्याच चेंडूवर ल्युकी फर्ग्युसनने भारताला धक्का देताना रिषभ पंतचा त्रिफळा उडवला. रिषभ १५ धावांवर, तर सूर्यकुमार यादव ४ धावांवर फर्ग्युसनच्याच गोलंदाजीवर माघारी परतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"