दुबई: भारतीय संघाने १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपविला, रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गड्यांनी पराभव करीत तिसऱ्यांदा विजेता करंडक उंचावला रोहित शर्माच्या नेतृत्वात नऊ महिन्यांत भारताचे हे दुसरे आयसीसी जेतेपद आहे. २९ जून २०२४ ला भारतीय संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला होता.
भारतीय संघ पाचव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी खेळला, २००० मध्ये नैरोबीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे उपविजेतेपदावर समाधान मानणारा भारतीय संघ २००२ मध्ये संयुक्त विजेता होता, २०१३ ला चॅम्पियन होण्याचा मान मिळविला तर २०१७ च्या स्पर्धेत भारताने पुन्हा उपवजेतेपदावर समाधान मानले होते. न्यूझीलंडला ५० षटकांत ७ बाद २५१ धावांत रोखल्यानंतर भारतीय संघाने विजयी लक्ष्य ४९ षटकांत ६ बाद २५४ असे गाठले. कर्णधार रोहित शर्मा सामनावीर तर रचिन रवींद्र स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. पाकिस्तानच्या यजमानपदाखाली आयोजित या स्पर्धेत 'हायब्रीड मॉडेल'नुसार भारत आपले सर्व सामने दुबईच्या मैदानात खेळला हे विशेष. विराट कोहली १ धाव काढल्यानंतर मायकेल ब्रेसवेलच्या चेंडूवर पायचित झाला. यानंतर श्रेयस अय्यर अक्षर पटेल यांनी चौथ्या गडधासाठी ६१ धावांची भागीदारी केली. ३७ व्या षटकांत तिसऱ्या चेंडूवर श्रेयसने ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर षटकार खेचला. पुढच्या चेंडूवर मात्र काइल जेमिसन याने त्याचा सीमारेषेवर झेल सोडला, याचा लाभ घेण्यात अपयशी ठरलेला श्रेयस ३९ व्या षटकांत (४८) रचिनकडे झेल देत परतला. अक्षर पटेल (२९), हार्दिक पांड्या (१८) यांनी संघाला विजयाच्या दारात आणले. लोकेश राहुल (नाबाद ३४) आणि रवींद्र जडेजा (नावाद ९) यांनी सहा चेंडूआधीच भारताचा विजय साकारला.
त्याआधी, भारतीय फिरकीपटूंच्या वर्चस्वानंतरही न्यूझीलंडने २५१ धावा ठोकून आव्हानात्मक मजल गाठली. डेरिल मिचेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी संयमी अर्धशतकी खेळी केली. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणाऱ्या न्यूझीलंडचे स्टार फलंदाज ढेपाळल्यानंतर या दोघांनी धावसंख्येला आकार दिला, मिचेलने १०१ चेंडूत ६३ आणि ब्रेसवेलने ४० चेंडूत नाबाद ५३ धावांचे योगदान दिले. फिरकीपटूंनी ३८ षटके गोलंदाजी करीत १४७ धावा दिल्या.
१०५ धावांची सलामी
रोहित शर्माने झंझावाती अर्धशतक झळकावले, पण २७ व्या षटकात रचिनला मोठा फटका मारण्याच्या नादात तो यष्टिचित झाला. त्याने ८३ चेंडूत ७६ धावा केल्या. त्याआधी, शुभमन गिल (३१) आणि रोहितने १८.४ षटकांत १०५ धावांची सलामी दिली.
मॅजिक नाइन....
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे आयसीसी चॅम्पियनशिपचे सामने ९
विराट कोहलीच्या टी-शर्ट नंबरची (१८) बेरीज ९ रोहित शर्माच्या टी-शर्ट नंबरची (४५) बेरीज ९
२०२५ या वर्षांची बेरीजसुद्धा होते ९
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याची कालची तारीख ९
कोहलीचा ५५०वा सामना
विराट कोहलीचा हा ५५०वा आंतरराष्ट्रीय सामना होता. ५५० किया त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो दुसरा भारतीय ठरला.
व्हाईट ब्लेझरची परंपरा...
चम्पियन्स ट्रॉफी विजेत्यांना व्हाईट ब्लेझर का दिले जाते, यामागे रंजक इतिहास आहे. या स्पर्धेची सुरुवात १९९८ ला झाली. त्यावेळी आयसीसी नॉकआऊट ट्रॉफी' असे नाय होते. त्यावेळी विजेत्यांना विशेष जैकेट देण्याची प्रथा नव्हती.
२००२ ला 'आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी' असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर १३ ऑगस्ट २००९ ला व्हाईट जॅकेटचे अनावरण झाले. मुंबईच्या डिझाईनर बबीता यांनी इटालियन बुलपासून हे जॅकेट डिझाईन केले आहे.
पांढरा रंग शुद्धता, स्वच्छता, आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. विजेत्यांची कामगिरी विशेष बनविण्याआठी आयोजकांनी हा रंग निवडला. या मागील दूसरे कारण असेही आहे की पांढरा रंग मैदानावर उठून दिसतो.
क्रिकेटपटू पांढरे कपडे घालतात. त्यामुळेच पांढऱ्या ब्लेझरची निवड है विजेत्यांच्या कर्तृत्वावर एकप्रकारे शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे. हा उदात्त हेतू डोळ्यापुढे ठेवून चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्यांना व्हाईट ब्लेझर देण्याची परंपरा सुरू झाली. ती आजतागायत कायम आहे.
भारताने १२ वर्षांनंतर रोहितच्या नेतृत्वात आयसीसी चम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा नाव कोरले.
रोहित शर्माच्या नेतृत्वावर भारत सलग चौथ्यांदा आयसीसी स्पर्धेत फायनल खेळला. रोहितने टी-२० चे जेतेपद मिळवून दिले, तर डब्ल्यूटीसी फायनल आणि वनडे विश्वचषकात पराभव झाला होता.
आयसीसी स्पर्धामध्ये भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे. त्याने टी-२० विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तीन स्पर्धा जिंकून दिल्या.
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी केले अभिनंदन!
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांनी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रपतींनी एक्सवर लिहिले, 'तीन वेळा चॉम्पयन्स ट्रॉफी जिंकणारा भारत पहिला संथ आहे. विजेते खेळाडू, व्यवस्थापन आणि सहयोगी स्टाफचे ऐतिहासिक विजेतेपदाबद्दल अभिनंदन तसेच भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.
पंतप्रधान मोदी यांनी भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी देशात आणल्याबद्दल भारतीय संघाचा गर्व वाटतो, असे म्हटले आहे. त्यांनी पुढे लिहिले की, 'आमच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली. अष्टपैलू कामगिरीसाठी भारतीय संघाचे अभिनंदन.