IND vs IRE 2nd T20I Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक अन् संजू सॅमसन, रिंकू सिंग व शिवम दुबे यांच्या फटकेबाजीने भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराह ( २-१५) प्रसिद्ध कृष्णा ( २-२९) व रवी बिश्नोई ( २-३७) यांनी कमालीची गोलंदाजी केली. रिंकू सिंगला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. या सामन्यानंतर कर्णधार जसप्रीतने चाहत्यांची मनं जिंकली.
संजू सॅमसन (४०) व ऋतुराज गायकवाड ( ५८) यांनी दमदार फटकेबाजी केली. त्यानंतर रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी २८ चेंडूंत ५५ धावांची भागीदारी करून भारताला मोठा पल्ला गाठून दिला. रिंकूने २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावा चोपल्या, तर शिवम २२ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने ५ बाद १८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडला ८ बाद १५२ धावा करता आल्या अन् भारताने ३३ धावांनी हा सामना जिंकला. अँडी बालबर्नीने ७२ धावांची खेळी करून भारतीयांची झोप उडवली होती.
रिंकूला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला गेला. यावेळी कर्णधार जसप्रीत त्याच्यासाठी ट्रान्सलेटर बनला. रिंकूने हिंदीत आपलं मत मांडलं अन् जसप्रीतने ते इंग्रजीत समजावून सांगितले. जसप्रीतच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली. रिंकू म्हणाला, दुसऱ्या सामन्यात मी आत्मविश्वासाने खेळलो. ही माझी पहिलीच इनिंग्ज होती आणि मी आयपीएलमधील अनुभव येथे वापरला. त्याचा मला आनंद आहे. मी कर्णधाराचं सर्व ऐकतो.''