मुंबई: तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा पराभव करत भारतानं मालिका 2-1 नं जिंकली. सलामीवीर रोहित शर्माच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारतानं 199 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. या विजयामुळे सलग सहा टी-20 मालिका जिंकण्याची कामगिरी भारतानं केली. भारतीय संघाच्या या कामगिरीचं सुनील गावसकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, मोहम्मद कैफ यांच्यासारख्या माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केलं आहे. मात्र हटके स्टाईलमध्ये भाष्य करणाऱ्या विरेंद्र सेहवागचं ट्विट भाव खाऊन गेलं आहे.
'इंग्लंड हम शर्मिंदा है, टॅलेंट अभी जिंदा है,' अशा शब्दांमध्ये भारतीय संघाचं कौतुक करत विरुनं इंग्लंडला टोला लगावला आहे. भारताचं कौतुक आणि इंग्लंडवर तोंडसुख असे दोन हेतू विरुनं एकाच वाक्यातून साधले आहेत. शानदार शतक झळकावणारा रोहित शर्मा आणि अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक पांड्या यांचं विरुनं कौतुक केलं आहे. रोहित शर्मानं शानदार फटकेबाजी केली, तर हार्दिकनं फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल केली, अशा शब्दांमध्ये सेहवागनं दोघांवर स्तुतीसुमनं उधळली.
याआधीही
विरेंद्र सेहवागनं अनेकदा इंग्लंडवर निशाणा साधला आहे. रिओ ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीची इंग्लिश पत्रकार पिअर्स मॉर्गननं खिल्ली उडवली होती. सव्वाशे कोटी जनतेच्या देशाला ऑलिम्पिकमध्ये किती पदकं पटकावता आली, अशा आशयाचं ट्विट मॉर्गननं केलं होतं. या ट्विटला उत्तर देताना क्रिकेटच्या जन्मदात्यांनी कितीवेळा विश्वचषक पटकावला, असा सवाल सेहवागनं विचारला होता. यानंतरही अनेकदा मॉर्गन आणि सेहवागमध्ये ट्विटरवर वाकयुद्ध रंगलं आहे.