पहिल्या सामन्यातील पराभव विसरून दमदार पुनरागमन केलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंडचा तब्बल ३३६ धावांनी दारूण पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ बरोबरी साधली. पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर घेतलेला शुभमन गिल भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शुभमन गिलने या सामन्यातील पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शतक झळकावून इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. शुभमन गिल उल्लेखनीय कामगिरी पाहून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा देखील त्याचे कौतुक करण्यापासून स्वत: रोखू शकला नाही.
बर्मिंगहॅम येथे कसोटी सामना जिंकणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला. तर, शुभमन गिल एकाच कसोटीत द्विशतक आणि १५० हून अधिक धावांची खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शुभमन गिलने २६९ धावा केल्या. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावातही १६१ धावा दमदार खेळी केली. तो अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा आणि एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. त्यामुळे भारताला इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीने शुभमन गिलसह मोहम्मद सिराज आणि युवा गोलंदाज आकाश दीप यांचे कौतुक केले.
बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ पहिल्या डावात ५८७ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर इंग्लंडचा संघ त्यांच्या पहिल्या डावात ४०७ धावाच करू शकला. मात्र, यामुळे भारताला मोठी आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताने ६ बाद ४२७ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २७१ धावांवर सर्वबाद झाला. हा सामना भारताने ३३६ धावांनी जिंकला.