IND vs ENG, Tilak Varma Hits Two Sixes And 1 Boundary in Jofra Archer's Over : चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्मानं इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जोफ्रा आर्चरच्या एका षटकात भारतीय युवा बॅटरनं दोन गगनचुंबी षटकारासह एक खणखणीत चौकार मारल्याचे पाहायला मिळाले. यावेळी स्टेडियममधील चाहत्यांसह इंग्लंडच्या गोलंदाजाची रिअॅक्शन बघण्याजोगी होती.
टीम इंडियाची सलामी जोडी स्वस्तात फिरली माघारी
इंग्लंडच्या संघाने दिलेल्या १६६ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं सलामीवीर संजू सॅमसन ५ (७) आणि अभिषेक शर्मा १२ (६) ही सलामी जोडी अगदी स्वस्तात माघारी फिरली. त्यानंतर मध्यफळीतील युवा बॅटर तिलक वर्मानं सूत्रे आपल्या हाती घेतली. कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या तिलक वर्मानं आक्रमक फलंदाजीचा तोरा दाखवून देत जोफ्रा आर्चरचे खांदे पाडले.
तिलक वर्माची तुफान फटकेबाजी, जोफ्राचा चेहराच पडला
भारतीय संघाच्या डावातील पाचव्या षटकात तिलक वर्मानं खणखणीत चौकार मारून जोफ्रा आर्चरचे स्वागत केले. याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर तिलक वर्मानं फाइन लेगच्या दिशेनं जबरद्सत षटकार मारला. त्याानंतर एक चेंडू निर्धाव खेळल्यावर चौथ्या चेंडूवर तिलक वर्मानं पुन्हा जोफ्राला आसमान दाखवलं. तिलक वर्माची तुफान फटकेबाजी बघून इंग्लंडच्या गोलंदाजाचा चेहराच पडला. चेहऱ्यावर उमटलेल्या नाराजीच्या छटांसह त्याची रिअॅक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.