आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने गतविजेत्या इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी आणि निर्णायक षटकांमध्ये जसप्रीत बुमराहने केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे भारताने वानखेडे स्टेडियमवर हा रोमहर्षक विजय मिळवला. आता जेतेपदासाठी भारताचा सामना बलाढ्य न्यूझीलंडशी होणार आहे. दरम्यान, भारताने हा सामना जिंकला, पण सामना कुठे पलटला, हे तुम्हाला माहिती आहे का?
वानखेडे स्टेडियमवर खेळलेला भारत-इंग्लंड सामना क्रिकेट चाहत्यांसाठी अक्षरशः थरारक ठरला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी जोरदार प्रतिकार करत सामना शेवटपर्यंत रंगतदार ठेवला. अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत सामना पुन्हा भारताच्या बाजूने वळवला. निर्णायक क्षणी घेतलेल्या विकेट्स आणि भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडची धावगती थांबली आणि भारताने हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारत विरुद्ध इंग्लंड: सामना कुठे पलटला?
संजू सॅमसनचे वादळी अर्धशतक
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात संमिश्र झाली. अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाला, पण सलामीवीर संजू सॅमसनने इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे काढली. सॅमसनने अवघ्या ४२ चेंडूत ८९ धावांची आक्रमक खेळी केली, ज्यामध्ये ८ चौकार आणि ७ गगनभेदी षटकारांचा समावेश होता. इशान किशन आणि शिवम दुबे यांच्या छोट्या पण वेगवान खेळींच्या जोरावर भारताने धावफलकावर २५३ धावांचा डोंगर उभा केला.
जोस बटलरची विकेट
विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडला त्यांच्या कर्णधाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. जोस बटलर धोकादायक ठरत असतानाच भारताचा फिरकीपटू वरूण चक्रवर्तीने त्याला २५ धावांवर बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. बटलर बाद झाल्याने इंग्लंडच्या धावगतीवर अंकुश लागला.
अक्षर पटेलची जबरदस्त फिल्डिंग
इंग्लंडच्या बाजूने सामना झुकत असल्यासारखे वाटत असतानाच १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नाट्यमय प्रसंग घडला. अर्शदीप सिंगच्या चेंडूवर विल जॅक्सने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेबाहेर जाणार असे वाटत असतानाच अक्षर पटेलने अप्रतिम झेप घेतली. तोल जात असल्याचे लक्षात येताच त्याने चेंडू हवेत उंच फेकला. त्या वेळी जवळ उभ्या असलेल्या शिवम दुबेने योग्यवेळी धाव घेत कॅच पूर्ण केला. हा झेल सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट ठरला. कारण तो चेंडू जर षटकारासाठी गेला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागण्याची शक्यता होती.
भारत vs इंग्लंड Semi-Final Match Highlights Video:
बुमराहचा खतरनाक स्पेल
एकवेळ इंग्लंडचा युवा फलंदाज जेकब बेथेल ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, ते पाहता सामना भारताच्या हातातून निसटतो की काय अशी भीती चाहत्यांना वाटू लागली होती. मात्र, १७ व्या षटकात जसप्रीत बुमराहने केवळ ६ धावा देत सामन्याचे चित्र पालटले. बुमराहने ४ षटकांत ३३ धावा देत १ बळी घेतला, पण त्याच्या अचूक माऱ्याने इंग्लंडच्या फलंदाजांना हात उघडण्याची संधीच दिली नाही.
इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय चुकला
नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला कमी धावसंख्येत रोखून नंतर लक्ष्याचा पाठलाग करत सामना जिंकण्याचा त्यांचा स्पष्ट प्लॅन होता. मात्र, भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत इंग्लंडच्या रणनीतीवर पाणी फेरले. संजू सॅमसनने दमदार सुरुवात करून संघाला वेगवान धावा मिळवून दिल्या. त्याला इशान किशन आणि शुभम दुबे यांची चांगली साथ लाभली. या जोरदार फलंदाजीच्या जोरावर भारताने २५० हून अधिक धावांचा भक्कम डोंगर उभारला. टी-२० क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे कोणत्याही संघासाठी मोठे आव्हान मानले जाते. त्यामुळे इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय अखेरीस त्यांच्याच अंगलट आला.
Web Summary : India beat England in a thrilling T20 World Cup semi-final. Samson's explosive batting, Bumrah's tight bowling, and England's flawed bowling decision led India to victory. India faces New Zealand in the final.
Web Summary : भारत ने टी20 विश्व कप सेमीफाइनल में इंग्लैंड को हराया। संजू सैमसन की विस्फोटक बल्लेबाजी, बुमराह की कसी हुई गेंदबाजी और इंग्लैंड का गेंदबाजी का गलत निर्णय भारत की जीत के कारण बने। फाइनल में भारत का मुकाबला न्यूजीलैंड से होगा।