शुभमन गिलने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध धमाकेदार खेळी करत शतक झळकावले आहे. एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचे ७ वे शतक आहे. त्याने ९५ चेंडूत आपले हे शतक पूर्ण केले. तसेच, १०२ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११२ धावा फटकावल्या.
तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात म्हणावी तशी झाली नही. भारतीय कर्णधार रोहित शर्मा लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी ११६ धावांची जबरदस्त भागीदारी केली. ५५ चेंडूत ५२ धावा करून विराट कोहली तंबूत परतला. यानंतरही शुभमन टिचून मैदानावर उभा होता.
आता या खास यादीत शुभमनचाही समावेश - महत्वाचे म्हणजे, या खेळीनंतर, शुभमन गिलचे नाव एका खास यादीत समाविष्ट झाले आहे. खरे तर, शुभमन गिल एकाच मैदानावर तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. शुभमन गिलने नरेंद्र मोदी स्टेडियमवर कसोटी एकदिवसीय आणि टी-२० अशा तिनही स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये शतके झळकावली आहेत.
गिल शिवाय, दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटर फाफ डु प्लेसिसचे नाव या यादीत आहे. त्याने जोहान्सबर्गच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. डेव्हिड वॉर्नरने अॅडलेड ओव्हलच्या मैदानावर हा पराक्रम केला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने कराचीतील नॅशनल स्टेडियमवर क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपांत शतक झळकावले आहे. तसेच, क्विंटन डी कॉकनेही सेंच्युरियनमध्ये हा पराक्रम केला आहे.