Shardul Thakur, Team India Playing XI, IND vs ENG: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. २० जूनपासून शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी भारत विरूद्ध भारत अ असा एक इंट्रा स्क्वाड सामना झाला. या सामन्यात मराठमोळ्या शार्दुल ठाकूरने शतक झळकावले आणि संघातील आपली दावेदारी निश्चित केली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताचा अंतिम संघ अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु आता शार्दुल ठाकूर त्या अंतिम संघाचा भाग असण्याची पूर्ण शक्यता आहे. नवा कसोटी कर्णधार शुभमन गिल त्याला खेळवण्याचा निर्णय घेऊ शकतो. शार्दुलच्या १२२ धावांच्या खेळीमुळे त्याला संघात जागा मिळू शकते. शार्दुलला संघात जागा मिळाल्यास प्लेइंग ११ मधून एका खेळाडूला बाहेर बसवले जाऊ शकते.
शार्दुल ठाकूर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये?
इंग्लंडविरुद्धच्या प्लेइंग ११ बाबत टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनापुढे अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी एक म्हणजे शार्दुल ठाकूरला संघात खेळवयाचे की नाही? शार्दुलचा सध्याचा फॉर्म उत्तम आहे. शार्दुल ठाकूरने डिसेंबर २०२३ मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला. गेल्या वर्षी त्याला संधी मिळाली नाही. पण त्याने हिंमत हरली नाही. देशांतर्गत क्रिकेट आणि काउंटी क्रिकेटमध्ये त्याला मिळालेल्या संधीचा त्याने फायदा घेतला. आताही त्याने इंट्रा स्क्वाड सामन्यात १२२ धावांची खेळी केली. त्यामुळेच तो पुन्हा एकदा टीम इंडियाची कसोटी जर्सी घालून मैदानात उतरताना दिसू शकतो.
गिल 'या' खेळाडूला वगळेल का?
शार्दुल ठाकूरला संघात घेतल्यास शुभमन गिल नितीश कुमार रेड्डीला बेंचवर ठेवू शकतो. नितीशने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शतक झळकावले होते. अशा परिस्थितीत, तो इंग्लंडमध्ये खेळण्याची शक्यता जास्त होती. पण आता शार्दुल ठाकूरने इंग्लंडच्या पिचवर शतक झळकावले. त्यामुळे आता या दोघांपैकी एकाची निवड करण्याबाबत पेच आहे. अशा परिस्थितीत शार्दुलला संघात स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण नितीशकुमार रेड्डीने अद्याप इंग्लंडमध्ये एकही सामना खेळलेला नाही. दुसरीकडे, शार्दुलला तिथे ३ कसोटी खेळण्याचा अनुभव आहे.