भारतीय संघानं तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून अगदी धमाक्यात सुरुवात केलीये. गोलंदाजीत वनडेत पदार्पण करणाऱ्या हर्षित राणाचा जलवा आणि रवींद्र जडेजाची फिरकीतील जादू दिसून आली. त्यानंतर बॅटिंगमध्ये श्रेयस अय्यर, शुबमन गिल आणि अक्षर पटेल यांनी छाप सोडली. इंग्लंडन दिलेल्या २४९ धावसंख्येचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरच्या अर्धशतकानंतर शुबमन गिलनं ९६ चेंडूत ८७ धावांची दमदार खेळी केली. त्याच्याशिवाय अक्षर पटेलनं ५२ धावांच्या खेळीसह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बॅटिंगमधील तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३९ षटकातच सामना संपवला. पण केएल राहुल आणि हार्दिक पांड्या आधी अक्षर पटेल का आला? हा प्रश्न अनेकांच्या मनात पडला आहे. मॅचनंतर रोहित शर्मानं याचं उत्तर दिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फलंदाजीवेळी अक्षर पटेलला देण्यात आली पाचव्या क्रमांकावर बढती
भारतीय संघाच्या विजयानंतर रोहित शर्मा खूपच खुश झाल्याचे दिसून आले. सामन्यानंतर भारतीय कर्णधाराने अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यामागचं कारण सांगितले आहे. खूप दिवसांनी एकदिवसीय सामना खेळत असल्यामुळे मध्यफळीत एखादा डावखुरा फलंदाज असावा, हा आमच्या प्लानचा एक भाग होता. त्यामुळेच अक्षर पटेलला बढती देण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे.
केएल राहुल-हार्दिक पांड्याआधी अक्षरला का पाठवलं? रोहितनं सांगितला त्यामागचा प्लान
अक्षर पटेलच्या तुलनेत लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या हे दोन संघातील प्रमुख फलंदाज आहेत. पण इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांना मागे ठेवून भारतीय संघाने अक्षर पटेलच्या रुपात नवा प्रयोग आजमावला. जो यशस्वीही ठरला. यासंदर्भात रोहित म्हणाला की, इंग्लंडचे गोलंदाज मध्यफळीतील फलंदाजांवर वर्चढ ठरू नयेत यासाठी आम्हाला लेफ्ट राइट कॉम्बिनेशनची गरज होती. शुभमन आणि अक्षर यांच्यात चांगली भागीदारी झाली. संघाच्या गरजेनुसार जे शक्य आहेत ते करण्यावर भर दिला जाईल, असेही त्याने यावेळी बोलून दाखवले.
संघ यशस्वी, पण कॅप्टन रोहित पुन्हा ठरला अपयशी
भारतीय संघाने सामना जिंकला असला तरी कर्णधार रोहित शर्मासाठी हा सामना पुन्हा एकदा एखाद्या भयावह स्वप्नासारखा ठरला. कारण बॅटिंगमध्ये तो फक्त २ धावा करून बाद झाला. ७ चेंडूचा सामना करून संघाच्या धावसंख्येत फक्त २ धावांची भर करून रोहित झेलबाद झाला. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कटकच्या मैदानात रंगणार आहे. ९ फेब्रुवारीला रंगणाऱ्या या सामन्यात तरी रोहितला सूर गवसणार का? हा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरतोय.