Sunil Gavaskar, Team India Test Captain, IND vs ENG Tests: भारतीय संघ सध्या आयपीएल स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेनंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून काही दिवसांपूर्वीच निवृत्ती स्वीकारली. याशिवाय भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यानेही कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. या दोन बड्या खेळाडूंशिवाय भारताचा संघ प्रथमच एखाद्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंडमध्ये भारत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण असावा, यावर अनेक तर्कवितर्क आणि सल्ले देण्यात येत आहेत. तशातच भारतीय संघाचे लिटलमास्टर सुनील गावस्कर यांनी एक पर्याय सुचवला आहे.
शुबमन गिल नको, 'याला' कर्णधार करा...
इंग्लंडच्या दौऱ्यासाठी नव्या दमाच्या शुभमन गिलला कर्णधारपदाची संधी द्यावी, असा एक सूर बरेच दिवसांपासून चाहत्यांमध्ये दिसत आहे. मात्र सुनील गावस्कर यांना हे मान्य नाही. त्यांच्या मते भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा ३१ वर्षीय अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडेच द्यावी. यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गावसकर काय म्हणाले?
सुनील गावसकर म्हणाले, "एखाद्या वेगवान गोलंदाजाच्या कामगिरीचं वर्कलोड किती असतं हे त्या गोलंदाजाव्यतिरिक्त आणखी चांगलं कुणालाच समजू शकत नाही. जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला कर्णधारपद दिले गेले तर तो कर्णधार बुमराहकडून कायमच जास्तीची अपेक्षा करणार. बुमराहने कितीही षटके टाकली, तरी त्याला आणखी एक षटक द्यावे असा मोह भारतीय संघाच्या नव्या कर्णधाराला नक्कीच होऊ शकतो, पण बुमराह कर्णधार झाला तर त्याला त्याच्या स्वतःच्या क्षमतेचा नीट अंदाज आहे. त्यामुळे त्याचा संघाला आणि त्यालाही फायदा होईल."
"जसप्रीत बुमराह हा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याला स्वतःचा योग्य तो अंदाज आहे. किती षटके झाल्यावर ब्रेक घ्यावा, कुठे थांबावे हे त्याला नीट कळते. त्यामुळेच त्याला कर्णधार करण्यात यावे, असे माझे मत आहे. काही लोक असेही म्हणतात की कर्णधारपद आणि गोलंदाजी अशी दोन कामे सांभाळणे एखाद्याला अवघड जाऊ शकते. पण माझ्या मते बुमराहकडे कर्णधार पद देणे हाच सर्वोत्तम पर्याय. त्याने आधीही ही जबाबदारी पार पाडली आहे. तसेच, त्याला अनुभवदेखील आहे," असे सुनील गावस्कर यांनी रोखठोकपणे सांगितले.