शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर ऐतिहासिक विजय नोंदवला. इंग्लंडला पराभूत करत टीम इंडियानं अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधलीये. याशिवाय एजबॅस्टनच्या मैदानातील पहिल्या विजयासह अनेक विक्रमही टीम इंडियानं आपल्या नावे केले. इंग्लंडला शह देत भारतीय संघाने पाकिस्तानलाही धोबीपछाड देण्याचा डाव साधलाय. इथं एक नजर टाकुयात इंग्लंडच्या खांद्यावरून पाकिस्तानवर निशाणा साधत टीम इंडियानं सेट केलेल्या खास विक्रमावर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानला मागे टाकत टीम इंडिया नंबर वन!
भारतीय संघ एजबॅस्टनच्या मैदानात १००० धावा करण्यासोबत कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे. या विजयासह SENA देशांत (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या आशियाई देशांमध्ये टीम इंडिया अव्वलस्थानी पोहचलीये. पाकिस्तानला मागे टाकत टीम इंडियाने नंबर वनचे स्थान पकटकावले आहे.
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
SENA देशांत कोणत्या आशियाई संघानं किती सामने जिंकले?
एजबॅस्टनच्या मैदानातील विजयासह भारतीय संघाने SENA देशांतील १७८ सामन्यात ३० कसोटी सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानात १४८ कसोटी सामन्यात २९ विजय मिळवल्याचा रेकॉर्ड आहे. या यादीत श्रीलंकेचा संघ ७६ पैकी ९ सामन्यातील विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशच्या संघाने या चार देशांत २५ सामने खेळले असून त्यांना फक्त न्यूझीलंडविरुद्ध एक विजय मिळवण्यात यश आले आहे.
मालिका विजयासह SENA देशांतील रेकॉर्ड अधिक भक्कम करण्याची संधी
भारतीय संघ इंग्लंड उर्वरित ३ कसोटी सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करून मालिका जिंकण्यासह SENA देशांतील रेकॉर्ड अधिक भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात रंगणार आहे. लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात भारतीय संघाच्या पदरी पराभव पडला असला तरी या सामन्यातही टीम इंडियाने कमालीची कामगिरी केली होती. त्यामुळेच उर्वरित ३ सामन्यात टीम इंडियाकडून खास कामगिरीची अपेक्षा असेल.