भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स येथील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात ३८७ धावांवर रोखत टीम इंडियानं आपल्या पहिल्या डावाची सुरुवात केली. यशस्वी जैस्वालच्या रुपात पहिली विकेट गमावल्यावर लोकेश राहुल आणि करुण नायर जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. पण चांगली सुरुवात मिळाल्यावर करुण नायर पुन्हा एकदा फसला. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये जो रुटनं त्याला झेलबाद केले. एका बाजूला भारतीय बॅटरवर आणखी एका डावात नामुष्की ओढावली. तर दुसऱ्या बाजूला त्याचा झेल टिपत रुटनं मोठा डाव साधला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् जो रुटनं मोडला द्रविडचा विक्रम
भारतीय संघाच्या पहिल्या डावातील २१ व्या षटकात बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर तो जो रुटच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. करुण नायर याने ६२ चेंडूचा सामना करताना ४ चौकाराच्या मदतीने ४० धावांची खेळी केली. जो रुटनं स्लिपमध्ये त्याचा अप्रतिम कॅच घेतला. यासह रुटनं कसोटी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाच्या रुपात सर्वाधिक राहुल द्रविडचा सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम मोडीत काढला.
मोजक्याच खेळाडूंनी कसोटीत घेतलेत २०० झेल
करुण नायरला तंबूचा धाडण्यासाठी जो रुटनं २११ वा झेल पकडत कसोटीत सर्वाधिक झेल टिपणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत अव्वलस्थानी पोहचला आहे. याआधी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावे होता. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत २१० झेल टिपल्याचा रेकॉर्ड आहे. रुट अन् द्रविडशिवाय महेला जयवर्धने, स्टीव्ह स्मिथ आणि जॅक कॅलिस या मोजक्या खेळाडूंनी कसोटीत २०० झेल पकडले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल टिपणारे खेळाडू
- जो रुट (इंग्लंड)- २११ झेल
- राहुल द्रविड (भारत)-२१० झेल
- महेला जयवर्धने (श्रीलंका)-२०५
- स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)- २००
- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)- २००