Mohammad Shami Video, Ind vs Eng T20 : कसोटीतील दोन वाईट पराभव विसरून आता भारतीय संघ टी२०च्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. त्याचा पहिला सामना २२ जानेवारी रोजी कोलकाता येथे खेळवला जाईल. या मालिकेतून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तब्बल १४ महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. शमीने पहिल्या सामन्याआधी एका खास व्हिडिओद्वारे इंग्लंड संघाला इशारा दिला आहे.
शमीने पोस्ट केलेल्या व्हिडीओत काय?
मोहम्मद शमी जेव्हा जेव्हा पुनरागमन करतो तेव्हा तो शानदार कामगिरी करतो हा इतिहास आहे. इंग्लंड संघाला त्याच्याबाबत सावधगिरी बाळगावी लागणार हे नक्कीच आहे. त्यासोबतच शमीने सोशल मीडियावरून इंग्लंडच्या संघाला इशारा दिला आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या किट बॅगमध्ये ठेवलेल्या अनेक शूजची पाहणी करताना दिसत आहे. तो हे शूज साफ करताना दिसतोय. तसेच 'प्रतीक्षा संपली आहे, मॅच मोड चालू झाला आहे आणि मी पुन्हा टीम इंडियामध्ये सामील होण्यास तयार आहे.' असे कॅप्शनही त्याने लिहिले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वर्णी लागणार का?
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने खूप घाम गाळला, पण त्याच्या फिटनेसने त्याला साथ दिली नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला मंजुरी दिली नव्हती. आता या इंग्लंड विरूद्धच्या मालिकेतून तो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपली दावेदारी सांगू शकतो. त्यामुळे त्याच्या खेळावर निवडकर्त्यांचे विशेष लक्ष असेल. त्यासोबतच जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने अनुभवी गोलंदाज म्हणूनही शमीला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.