भारतीय अंडर १९ संघाने झिम्बाब्वेच्या हरारेच्या मैदानात इंग्लंडला १०० धावांनी पराभूत करत विक्रमी विजयासह सहाव्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. IPL पासून प्रत्येक स्पर्धेत शतक ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून फायनलपर्यंत एकही शतक आले नव्हते. पण इंग्लंडविरुद्धच्या जेतेपदाच्या लढतीत त्याने ऐतिहासिक खेळी साकारली. वाऱ्याच्या वेगाने शतक साजरे करून तो अगदी द्विशतकाच्या जवळ पोहचला होता. २५ धावांनी त्याचा द्विशतकी डाव फसला, पण शेवटी त्याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावरच टीम इंडियाला जेतेपदाचं समाधान मिळालं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फायनलआधी निराश होता वैभव सूर्यवंशी, कारण....
फायनलमध्ये धडक मारल्यावरही शतकाचा रकाना रिकामा असल्यामुळे वैभव सूर्यवंशी दु:खी होता. कुठंतरी कमी पडल्याची खंत मनात असताना त्याने 'बाप-माणसा'ला एक कॉल केला अन् या कॉलवर झालेल्या संवादातील 'त्या' शब्दांनी त्याला बळ मिळालं. १४ वर्षाच्या लेकानं शेवटी शतक ठोकलं. युवा टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर खुद्द वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनीच यासंदर्भातील खास गोष्ट सांगितली आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भात सविस्तर
Under 19 World Cup 2026: विजयाचं 'वैभव' ! मराठमोळ्या आयुष म्हात्रेची 'U19 टीम इंडिया' सहाव्यांदा 'वर्ल्ड चॅम्पियन'
मनातील शंका दूर झाली अन् वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून मोठी खेळी आली
भारतीय संघाने ऐतिहासिक जेतेपद मिळवल्यावर स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये वैभव सूर्यवंशीचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी लेकाच्या मनात सलणाऱ्या गोष्टीवर भाष्य केले. ते म्हणाले की, "सेमीफायनलनंतर वैभव स्वत:च्या कामगिरीवर निराश होता. आतापर्यंत प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत शतक झळकावले. पण या स्पर्धेत मोठी खेळी करता आली नाही, असे त्याला वाटत होते. पप्पा माझ्याकडून सातत्याने काही तरी चूक होत आहे, असे त्याने बोलून दाखवले. यावर मी त्याला दिलासा दिला. तू चांगला खेळत आहेस. तुझ्या कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत. बाकी सर्व देवावर सोड अन् तू तुझा स्वाभाविक खेळ खेळत राहा, असा सल्ला त्याला दिला. मी त्याच्या कामगिरीवर नाराज नाही, हे ऐकून त्याला बरे वाटले आणि त्याच्या बॅटमधून मोठी खेळी आली." अशी स्टोरी त्यांनी शेअर केली.
वैभव सूर्यवंशीची लक्षवेधी कामगिरी
- वय १२ वर्षे २८४ दिवस असताना रणजी ट्रॉफीत पदार्पण
- विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ८४ चेंडूत १९० धावा
- IPL २०२५ च्या हंगामात ३८ चेंडूत १०१ धावांची झंझावाती खेळी
- अंडर-१९ आशिया कप स्पर्धेत ९५ चेंडूत १७१ धावा
- यूथ टेस्ट सामन्यात ६२ चेंडूत १०४ धावा
- सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत ६१ चेंडूत १०८ धावा
- रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेत ४२ चेंडूत १४४ धावा
- अंडर-१९ वर्ल्ड कप स्पर्धेत ८० चेंडूत १७५ धावा