Gus Atkinson, IND vs ENG : बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवर भारतीय संघाविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला ३३६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवार (१० जुलै) पासून लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटीसाठी यजमान इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ६ जुलै रोजी संघाची घोषणा केली. त्यात उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज गस अटकिन्सनचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे.
मे महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध नॉटिंगहॅम कसोटी सामन्यादरम्यान अॅटकिन्सनला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. गस अटकिन्सनच्या पुनरागमनामुळे इंग्लंड संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणात भर पडली आहे. २७ वर्षीय गस अटकिन्सनचा कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. अॅटकिन्सनने आतापर्यंत इंग्लंडसाठी १२ कसोटी सामन्यांमध्ये २२.३० च्या सरासरीने ५५ बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याने तीन वेळा डावात पाच बळी घेतलेत, तर एकदा त्याने एका सामन्यात १० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.
गस अॅटकिन्सनने जुलै २०२४ मध्ये लॉर्ड्स येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने पदार्पणाच्या सामन्यात एकूण १२ बळी घेतले होते. २०२४ मध्ये अटकिन्सनने १२ कसोटी सामन्यांमध्ये ५२ बळी घेतले. गेल्या वर्षी जसप्रीत बुमराहनंतर तो सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज होता.
तिसऱ्या कसोटीसाठी १६ सदस्यीय संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अटकिन्सन, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओवर्टन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जोश टंग, क्रिस वोक्स.