IND vs ENG Day 5 Scenario : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना लंडनमधील 'द ओव्हल' येथे खेळला जात आहे. हा सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आहे. आता सामन्याचा पाचवा दिवस बाकी आहे. इंग्लंड विजयापासून ३५ धावा दूर आहे, तर भारताला विजयासाठी ४ बळींची गरज आहे. म्हणजेच दोन्ही संघांपैकी कोणताही संघ हा सामना जिंकू शकतो. अशा परिस्थितीत एक गोष्ट भारतासाठी 'गेमचेंजर' ठरू शकते.
इंग्लंडचे शेवटचे ४ बळी शिल्लक
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात इंग्लंडचा स्कोअर ६ विकेटवर ३३९ धावा होता. जेमी स्मिथ २ धावांवर आणि जेमी ओव्हरटन ० धावांवर नाबाद होता. स्मिथ विकेटकीपर फलंदाज आहे, तर ओव्हरटन वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. जर भारतीय संघ सुरुवातीला या दोघांचेही बळी घेण्यात यशस्वी झाला तर सामना भारताच्या मुठीत येऊ शकतो. जोश टंग, गस अटकिन्सन आणि ख्रिस वोक्स हदेखील चांगली फलंदाजी करू शकतात, परंतु स्मिथ आणि ओव्हरटनचे बळी भारतासाठी खूप महत्त्वाचे असतील.
भारतासाठी हा घटक 'गेमचेंजर'
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ७६.२ षटके खेळली गेली आहेत. ८० षटके पूर्ण झाल्यानंतर, भारतीय कर्णधार शुभमन गिलकडे नवीन चेंडू घेण्याचा पर्याय असेल आणि शुभमन नक्कीच नवा चेंडू घेईल. खेळपट्टी अजूनही गोलंदाजांसाठी खूप अनुकूल आहे, त्यामुळे नवीन चेंडू अधिक वेग आणि उसळी देईल आणि विकेट घेणे सोपे होईल. भारताकडे उत्कृष्ट गोलंदाजी आक्रमण आहे, ज्यामुळे पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाला कमी धावसंख्येत रोखता आले. आताही नव्या चेंडूने मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णासारखे वेगवान गोलंदाज लवकरच उर्वरित विकेट घेऊ शकतात.
निकाल पहिल्या सत्रातच
सामना ज्या टप्प्यावर उभा आहे, तिथे सामना अनिर्णित राहण्याची शक्यता फारच कमी आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात निकाल लागण्याची शक्यता आहे. आज लंडनमधील हवामान देखील खेळासाठी अनुकूल असेल आणि पहिल्या सत्रात पावसाची शक्यता नगण्य आहे.