Chris Woakes Injury and Batting, IND vs ENG: लंडनच्या ओव्हल क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेला कसोटी सामना अतिशय रोमांचक परिस्थितीत आहे. चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात ६ बाद ३३९ धावा केल्या. इंग्लंडचा संघ विजयापासून ३५ धावा दूर आहे. तर भारतीय संघाला ४ बळींची गरज आहे. भारताकडे हा सामना जिंकून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी करण्याची संधी आहे. अशातच इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स याच्या दुखापतीबद्दल आणि फलंदाजीबद्दल चर्चा रंगली आहे. ख्रिस वोक्स दुखापतग्रस्त असून तो सामन्याबाहेर झाला आहे, अशी अधिकृत घोषणा इंग्लंडच्या संघाने केली होती. असे असूनही, आता तो फलंदाजीसाठी उतरू शकतो का? असा प्रश्न विचारला जात आहे. जाणून घ्या, ICC चा नियम काय...
वोक्स दुखापतग्रस्त, फलंदाजीचे काय?
ओव्हल कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी गरज पडल्यास ख्रिस वोक्स फलंदाजीला येईल, अशी चर्चा रंगली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सला खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) म्हटले होते की, ख्रिस वोक्स आता या सामन्यात भाग घेणार नाही. त्यानुसार, पहिल्या डावात ख्रिस वोक्स फलंदाजीला आला नाही. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात त्याने गोलंदाजीही केली नाही. पण आता त्याच्या फलंदाजीवरून प्रश्न उपस्थित होत आहेत.
ICC चा नियम काय?
जेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूट बाद झाला तेव्हा स्क्रीनवर क्रिस वोक्स दाखवण्यात आला. इंग्लंडच्या जर्सीमध्ये क्रिस वोक्स दिसला. अशा परिस्थितीत, गरज पडल्यास वोक्स पाचव्या दिवशी फलंदाजीला येईल अशी अपेक्षा आहे. पण प्रश्न असा आहे की वोक्सला दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची परवानगी मिळेल का. तर उत्तर आहे - हो. ख्रिस वोक्सला फलंदाजी करण्यापासून रोखण्याचा कोणताही नियम नाही. आयसीसीच्या नियमांनुसार, पाच विकेट पडण्यापूर्वी वोक्स फलंदाजीला येऊ शकत नव्हता कारण तो भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात मैदानावर दिसला नव्हता. पण आता इंग्लंडने ६ विकेट गमावल्या असल्याने, ख्रिस वोक्स केव्हाही मैदानात फलंदाजीसाठी उतरू शकतो.