Rishbah Pant Ruled Out, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवण्यात आला. रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारतीय संघाने हा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. सध्या ही मालिका २-१ अशी इंग्लंडच्या बाजुने झुकलेली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ३१ जुलैपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. पण या कसोटीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या सामन्यातून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत घोषणा केली. ऋषभ पंतच्या जागी तमिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज नारायण जगदीसनला (N Jagadeesan) पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
कोण आहे एन जगदीसन?
एन. जगदीसन याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. जगदीसनला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बराच अनुभव आहे. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ३००० हून जास्त धावा केल्या आहेत. तसेच, १३०हून जास्त झेल टिपले आहेत. तसेच, IPL मध्येही KKR आणि CSK संघाकडून खेळताना त्याने १३ सामन्यात ११०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. ध्रुव जुरेल आधीच संघात आहे. तसेच केएल राहुल हा देखील एक पर्याय आहे, परंतु तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे तो कसोटीत यष्टीरक्षक म्हणून खेळत नाही. अशा वेळी जगदीसनच्या समावेशामुळे भारताला दुसरा स्पेशालिस्ट यष्टीरक्षक मिळाला आहे.
पंतच्या पायाला फ्रॅक्चर
बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान ऋषभ पंतला उजव्या पायात फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवेल. पुरुष निवड समितीने ऋषभ पंतच्या जागी पाचव्या कसोटी सामन्यासाठी नारायण जगदीसनचा संघात समावेश केला आहे. पाचवा सामना ३१ जुलै २०२५ पासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जाईल.
ऋषभ पंतला दुखापत कशी झाली?
मँचेस्टर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतला दुखापत झाली होती. ख्रिस वोक्सचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्नात असताना पंतचा फटका चुकला. चेंडू त्याच्या उजव्या पायाला जोरदार लागला. यामुळे पंतला रिटायर हर्ट करावे लागले. तथापि, पंत दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी परतला आणि ५४ धावा करण्यात यशस्वी झाला. पण त्यानंतर तो मैदानात उतरला नाही.
पाचव्या कसोटीसाठी भारताचा सुधारित संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग, एन. जगदीसन (यष्टीरक्षक).
Web Title: IND vs ENG Big blow to Team India Rishabh Pant ruled out of fifth Test due to injury N Jagadeesan named replacement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.