Join us

'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी

चार वर्षांनी शुबमन गिलनं आशिया बाहेरील मैदानात ठोकलं दमदार अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 20:32 IST

Open in App

Shubman Gill Fifty Plus Score Their Test Captaincy Debut  : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्यांदा कॅप्टन्सी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या शुबमन गिलनं आपल्या फलंदाजीतील खास झलक दाखवत नव्या पर्वाची सुरुवात एकदम दमदार केलीये. लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशीच बॅटिंग करण्याची वेळ आल्यावर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शुबमन गिलनं कॅप्टन्सीतील पदार्पणात अर्धशतकी खेळी केलीये. त्याने ५६ चेंडूत अर्धशतक साजरे केले. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे सर्वात जलद अर्धशतकही ठरले. याशिवाय  त्याची ही खेळी अनेक अर्थाने अविस्मरणीय आहे. जाणून घेऊयात त्याच्या या खेळीतील खासियत 

विराट कोहलीप्रमाणेच कॅप्टन्सीची तोऱ्यात सुरुवात

विराट कोहलीनं भारतीय संघाचे नेतृत्व करताना पहिल्याच सामन्यात शतकी खेळी साकारली होती. २०१४ मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध धमाकेदार खेळीसह त्याने कॅप्टन्सीची खास छाप सोडली होती. शुबमन गिलनंही त्याच तोऱ्यात इंग्लंड विरुद्ध अर्धशतकासह कॅप्टन्सीचा शुभ आरंभ केलाय.

चार वर्षांनी शुबमन गिलच्या भात्यातून आशिया बाहेरील मैदानात अर्धशतकी खेळी

शुबमन गिल याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खास छाप सोडलीये. पण इंग्लंडमधील त्याची कामगिरी ढिसाळ राहिली होती. आतापर्यंत इथं खेळलेल्या ३ सामन्यात त्याने फक्त ८८ धावा केल्या होत्या. कॅप्टन्सीची जबाबदारी असताना त्याने पहिल्याच कसोटी सामन्यातील पहिल्याच डावात दमदार अर्धशतक झळकावले. ४ वर्षांनी कसोटीत त्याच्या भात्यातून आशिया बाहेरील मैदानात अर्धशतक पाहायला मिळाले.  याआधी २०२१ मध्ये शुबमन गिलच्या भात्यातून १५ जानेवारी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध १४६ चेंडूत ९१ धावांची खेळी पाहायला मिळाली होती.   

शुबमनचं इंग्लंडच्या मैदानातील पहिलं अर्धशतक

आतापर्यंत शुबमन गिलनं ३ कसोटी सामन्यात १४.६६ च्या सरासरीसह इंग्लंडमध्ये ८८ धावा केल्या होत्या. २८ ही त्याची इंग्लंडमधील सर्वोच्च धावसंख्या होती. या दौऱ्यावर कसोटी संघाचे नेतृत्व मिळाल्यावर त्याच्या या आकडेवारीवरून प्रश्नचिन्ह देखील उपस्थितीत करण्यात आले होते. यावर शुबमन गिलनं मागील आकडे न पाहता सर्वोत्तम कामगिरी करण्यावर लक्षकेंद्रीत करतोय, असे म्हटले होते. आपल्या भात्यातील फटकेबाजीनं त्याने ते सिद्धही करून दाखवलंय. कॅप्टन्सी करताना चौथ्या क्रमांकावर नवी जबाबदारी स्विकारत त्याने अर्धशतकी खेळी साकारली आहे.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलबेन स्टोक्स