भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिका २० जूनपासून हेडिंग्ले, लीड्स येथे सुरुवात होत आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. सध्या जबरदस्त फॉर्मात असलेला आणि सराव सामन्यांमध्ये २५९ धावा झोडून सर्वांचे लक्ष वेधून घेणारा एक फलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे. हा खेळाडू म्हणजे, करुण नायर. नायरला ८ वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमनाची संधी होती. मात्र माध्यमांतील वृत्तांनुसार, करुण नायरच्या बरगडीवर चेंडू लागल्याने त्याला दुखापत झाली आहे.
पहिल्या कसोटीपूर्वी करुण नायर नेटमध्ये सराव करत होता. यावेळी, प्रसिद्ध कृष्णाचा एक चेंडू त्याच्या बरगडीत लागला. यामुळे त्याला दुखापत झाली आहे. यामुळे आता तो इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकेल की नाही? अशी शक्यता निर्माण झाली आहे.
करुण नायरच्या दुखापतीसंदर्भात बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. तो लीड्स कसोटीसाठी फीट होईल की नाही, हे देखील सांगण्यात आलेले नाही. जर त्याची दुखापत गंभीर असेल, तर ती केवळ त्याच्यासाठीच नाही, तर संघासाठीही मोठी समस्या असू शकते.
करुण नायरने २०१७ मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून त्याला संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, यावेळी त्याची भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. त्याने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन सराव सामन्यांच्या तीन डावात २५९ धावा केल्या आहेत.
करुण नायरच्या दुखापतीमुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनसंदर्भातील सस्पेंस अद्याप कायम आहे. तर दुसरीकडे इंग्लंडने पहिल्या टेस्टसाठी आपला प्लेइंग XI संघाची घोषणा केली आहे.
इंग्लंडची प्लेइंग XI -बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडेन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर
भारताचा संभाव्य संघ... - शुभमन गिल (कर्णधार),ऋषभ पंत (उप-कर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जायसवाल,केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.