Sitanshu Kotak On Jasprit Bumrah : लंडन येथील केनिंग्टन ओव्हलच्या मैदानात ३१ जुलै पासून भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यानंतर इंग्लंडच्या संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत राखण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे. संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी जसप्रीत बुमराह मैदानात उतरणार का? यासंदर्भात फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जसप्रीत बुमराहसंदर्भात काय म्हणाले कोच?
मॅच दोन दिवसांवर असताना बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "बुमराहला खेळवण्यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. पण तो खेळण्यासाठी आहे. आम्ही लवकरच त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटसंदर्भात निर्णय घेऊ. बुमराहसंदर्भातील अंतिम निर्णय मॅचच्या दिवशी कॅप्टन आणि कोच घेतील." अशी माहिती फलंदाजी प्रशिक्षकांनी दिलीये.
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
फक्त ३ मॅच खेळण्याचं ठरलं, पण आता....
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली त्याच वेळी जसप्रीत बुमराह ५ कसोटी सामन्यांपैकी फक्त ३ सामन्यात खेळणार, असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानातील सामन्यानंतर बर्मिंगहॅमच्या कसोटीत बुमराहने विश्रांती घेतली. त्यानंतर लॉर्ड्स आणि मँचेस्टरच्या मैदानात तो खेळताना दिसला. ठरल्याप्रमाणे त्याने ३ सामने खेळले आहेत. पण पाचवा सामना मालिका वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे बुमराहला मैदानात उतरवण्याचा पर्याय टीम इंडियाकडे अजूनही खुला असल्याचे समोर येत आहे.
बुमराहला खुणावताहेत हे विक्रम
इंग्लंडच्या मैदानात भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या अव्वलस्थानी पोहचण्याची संधी बुमराहकडे आहे. इशांत शर्मानं १५ सामन्यात इथं ५१ विकेट्स घेतल्या असून जसप्रीत बुमराहनं १२ कसोटी सामन्यात त्याची बरोबरी साधलीये. जर ओव्हलच्या मैदानात बुमराह खेळताना दिसला तर तो एक विकेट घेत इशांत शर्माला सहज मागे टाकू शकतो. एवढेच नाही तर ३ विकेट्स घेत वासीम अक्रमला मागे टाकत इंग्लंडमध्ये आशियातील नंबर वन गोलंदाज होण्याचा डावही त्याला साधता येईल.