IND vs ENG, First Time In Test Cricket History Team India Do This : सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर ओव्हल कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी ३५ धावांचा बचाव करताना भारतीय संघाने २८ धावांत ४ विकेट्स घेत सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघाने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील ५ सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधलीये. आतापर्यंत कधीचं घडलं नव्हत ते टीम इंडियाच्या ओव्हलच्या मैदानातील विजयानं साध्य झाले. जाणून घेऊया टीम इंडियाच्या त्या खास कामगिरीवर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रसिद्ध कृष्णाचा 'चौकार'; सिराजनं मारला विजयी 'पंजा'
भारतीय संघाने ओव्हलच्या मैदानात इंग्लंडसमोर ३७४ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी शतकी खेळी केल्यामुळे टीम इंडिया मागे पडली. पण या दोन विकेट्स मिळताच भारतीय गोलंदजांनी दमदार कमबॅक केले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात आकाशदीपनं हॅरी ब्रूकची विकेट घेतलली. याशिवाय प्रसिद्ध कृष्णानं जो रुटसह चार विकेट आपल्या खात्यात जमा केल्या. मोहम्मद सिराजनं पहिली अन् अखेरची विकेट घेत या सामन्यात 'पंजा' मारला अन् भारतीय संघाने सामना जिंकत मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले.
टीम इंडियासमोर मालिका बरोबरीत राखण्याचे होते आव्हान
इंग्लंड दौऱ्यातून शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात भारतीय संघाकडून फलंदाजीत धमक दिसली. पण या सामन्यात शेवटी इंग्लंडच्या संघाने बाजी मारली. बर्मिंगहॅमच्या मैदानात टीम इंडियाने दमदार कमबॅक करत ऐतिहासिक विजय नोंदवला. पण लॉर्ड्सच्या मैदानात पुन्हा टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. तीन कसोटी सामन्यानंतर इंग्लंडच्या संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. मँचेस्टर कसोटी सामन्यात टीम इंडियानं जोर लावला. पण हा सामना अनिर्णित राहिल्यामुळे मालिका जिंकण्याचा विषयच संपला. ओव्हलच्या मैदानातील सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर होते.
कसोटी इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
याआधी कधीच भारतीय संघाने परदेशात शेवटचा कसोटी सामना जिंकला नव्हता. पण सिराज अन् प्रसिद्ध कृष्णानं आपल्या गोलंदाजीत धमक दाखवली अन् हातून निसटलेला सामना जिंकत टीम इंडियाने इतिहासात पहिल्यांदाच शेवटचा सामना जिंकून दाखवत मालिका बरोबरीचा डाव साधला. याआधी भारतीय संघाने परदेशातील मैदानात ५ सामन्यांच्या १६ मालिका खेळल्या होत्या. यात ६ वेळा टीम इंडियाच्या पदरी पराभव तर १० सामने अनिर्णित राखण्यात टीम इंडियाला यश आले होते.