IND vs ENG: भारताचे युवा खेळाडू लै हुश्शार! कर्णधार रोहित शर्माने विजयानंतर व्यक्त केला आनंद

India vs England 5th Test: पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 04:42 PM2024-03-09T16:42:02+5:302024-03-09T16:44:57+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test Match Team India won the last test match by an innings and 64 runs Captain Rohit Sharma expressed his happiness | IND vs ENG: भारताचे युवा खेळाडू लै हुश्शार! कर्णधार रोहित शर्माने विजयानंतर व्यक्त केला आनंद

IND vs ENG: भारताचे युवा खेळाडू लै हुश्शार! कर्णधार रोहित शर्माने विजयानंतर व्यक्त केला आनंद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 5th Test Match: कसोटी मालिकेत इंग्लंडविरूद्ध मोठा विजय मिळवल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आनंद व्यक्त केला. पहिला सामना जिंकल्यानंतर इंग्लंडने सलग चार सामने गमावले. शनिवारी अखेरचा कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने मालिका ४-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली. भारताने मालिकेतील अखेरचा अर्थात पाचवा कसोटी सामना एक डाव आणि ६४ धावांनी जिंकला. भारताने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारल्यानंतर इंग्लंडकडून जो रूटने एकट्याने खिंड लढवली. पण त्याला कुलदीप यादवने बाद करून इंग्लिश संघाला १९५ धावांत गुंडाळले. विजयानंतर रोहित शर्माने आपल्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांच्या खेळीला दाद दिली. 

रोहित शर्मा म्हणाला की, संघाने सांघिक खेळी केल्याने हा विजय मिळाला. या संघातील खेळाडूंकडे कदाचित अनुभव कमी असावा पण त्यांनी खूप क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे मी नक्कीच सांगू शकतो की, दबावाखाली ते खूप चांगल्या पद्धतीने खेळू शकतात. याचे श्रेय संपूर्ण संघाला जाते आणि ते पाहून मला आनंद झाला. आपण जेव्हा अशी मालिका जिंकतो तेव्हा सर्वजण बोलतात की, सामना जिंकण्यासाठी धावा आणि शतके झळकावण्याची गरज असते. मात्र, कसोटी जिंकण्यासाठी २० बळी घेणे महत्त्वाचे असते. गोलंदाजांनी ज्या पद्धतीने जबाबदारी घेतली ते पाहून आनंद झाला.

रोहितने व्यक्त केला आनंद 

तसेच कुलदीप यादवने चांगली कामगिरी केली, त्याच्यात खूप क्षमता आहे. दुखापतीनंतर तो परत आला आणि NCA मध्ये काम केले. तो खूप मेहनत घेत आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याची फलंदाजी. यशस्वी जैस्वालला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्याने या मालिकेत दमदार खेळी केली असून त्याला मोठी धावसंख्या करायला आवडते, असेही भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले. 

भारताचा ४-१ ने विजय 
इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ५७.४ षटकांत सर्वबाद २१८ धावा केल्या होत्या. इंग्लंडने २१८ धावा केल्यानंतर भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. भारताने पहिल्या डावात ४७७ धावा करून २५९ धावांची चांगली आघाडी घेतली. रोहित शर्मा (१०३), शुबमन गिल (११०), यशस्वी जैस्वाल (५७), देवदत्त पडिक्कल (६५) आणि सर्फराज खान (५६) यांनी अप्रतिम खेळी करून इंग्लिश संघासमोर धावांचा डोंगर उभारला. यजमान संघाने २५९ धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडसमोर मोठे आव्हान उभे राहिले. दुसऱ्या डावात पाहुण्या संघाकडून जो रूटने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली आणि जॉनी बेअरस्टोने (३९) धावा केल्या. यांच्याशिवाय एकाही शिलेदाराला २० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात ४८.१ षटकांत सर्वबाद १९५ धावा केल्या अन् भारताने ४-१ ने मालिका जिंकली.

Web Title: IND vs ENG 5th Test Match Team India won the last test match by an innings and 64 runs Captain Rohit Sharma expressed his happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.