भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडला कडवं आव्हान दिलं आहे. या मालिकेत इंग्लंडचा संघ २-१ असा आघाडीवर असला तरी चारही कसोटी सामन्यात भारतीय संघाने त्यांना जोरदार झुंज दिली आहे. अशा परिस्थितीत कालपासून ओव्हलवर सुरू झालेला पाचवा कसोटी सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. मात्र या सामन्यासाठी संघनिवड करताना भारतीय संघाकडून एक मोठी चूक झाली असून, त्या चुकीचा फटका संघाला या सामन्यात बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय संघाने ओव्हल कसोटी सामन्यामधून आपला आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला वगळले आहे. या मालिकेतील लीड्स, लॉर्ड्स आणि ओव्हल कसोटी सामन्यात खेळणाऱ्या बुमराह याला तंदुरुस्तीच्या कारणास्तव विश्रांती देण्यात आली आहे. मात्र त्याला विश्रांती देण्याचा निर्णय ओव्हल कसोटीमध्ये भारतीय संघाला महागात पडू शकतो. त्याचं कारण म्हणजे ओव्हलमधील खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल दिसत आहे. तसेच या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह संघात असता तर त्याचा अनुकूल वातावरणामध्ये भारतीय गोलंदाजीला झाला असता.
दरम्यान, ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केले होते. मात्र पावसाचा वारंवार व्यत्यत आलेल्या पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये गोलंदाजीला अनुकूल वातावरणामध्ये भारतीय फलंदाज चाचपडताना दिसले. त्यामुळे पहिल्या दिवशी झालेल्या ६४ षटकांच्या खेळानंतर भारतीय संघाने ६ बाद २०४ अशी मजल मारली आहे. भारताकडून करुण नायर ( नाबाद ५२) आणि वॉशिंग्टन सुंदर (नाबाद १९) हे खेळपट्टीवर उभे आहेत.