IND vs ENG 4th Test Shubman Gill Breaks Pakistan Mohammad Yousuf Record : मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात टीम इंडिया अडचणीत असताना टीम इंडियाचा नवा 'सेनापती' शुबमन गिल याने संघाचा डाव सावणारी खेळी केली. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतल्यावर दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात एकदम खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर यशस्वी जैस्वाल पाठोपाठ साई सुदर्शन याने तंबूचा रस्ता धरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शुबमन गिलनं साधला मोठा डाव
संघाची अवस्था २ बाद शून्य अशी असताना शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने अनुभवी बॅटर आणि सलामीवीर लोकेश राहुलसोबत उत्तम खेळीचा नजराणा पेश करताना संघाला मोठा दिलासा दिला आहे. एवढेच नाही कसोटी कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकवताना त्याने मोठा डाव साधला आहे.
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
गिलनं इंग्लंडच्या मैदानात पाकिस्तानच्या दिग्गजाला दिली 'धोबीपछाड'
मँचेस्टर कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अपयशी ठरल्यावर दुसऱ्या डावातील अर्धशतकाच्या जोरावर शुबमन गिलनं मोठा डाव साधला आहे. तो आता इंग्लंडच्या मैदानात एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा आशियाई बॅटर ठरला आहे. याआधी हा विक्रम पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मोहम्मद युसुफ याच्या नावे होता. २००६ मध्ये पाकिस्तानच्या दिग्गजाने चार कसोटी सामन्यात ६३१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानच्या फलंदाजाला धोबीपछाड देत शुबमन आता नंबर वन फलंदाज ठरला आहे.
शुबमन गिलची इंग्लंड दौऱ्यावरील कामगिरी
इंग्लंड दौऱ्यातून कॅप्टन्सीची नवी इनिंग सुरु करणाऱ्या शुबमन गिलनं लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात १४७ आणि दुसऱ्या डावात ८ धावांची खेळी केली होती. बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन कसोटी सामन्यातील पहिल्या डावात २६९ धावा केल्यावर दुसऱ्या डावात त्याने १६१ धावांची धमाकेदार इनिंग खेळली होती. लॉर्ड्सच्या मैदानातील तिसऱ्या सामन्यात शुबमन गिल अपयशी ठरला. पहिल्या डावात १६ आणि दुसऱ्या डावात तो अवघ्या ६ धावांवर बाद झाला. मँचेस्टर कसोटीतील पहिल्या डावात १२ धावांवर तंबूत परतल्यावर दुसऱ्या डावात त्याने कमबॅक करत महत्त्वपूर्ण खेळी साकारली.