Ball Tampering IND vs ENG 4th Test: अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा चौथा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी सलामीवीर केएल राहुल या दोघांनी भारतीय संघाकडून शानदार फलंदाजी केली. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताने चौथ्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत दोन विकेट गमावून १७४ धावा केल्या. भारतीय संघ अजूनही इंग्लंडपेक्षा १३७ धावांनी मागे आहे. आता जर भारतीय फलंदाजांनी पाचव्या दिवशी चांगली कामगिरी केली तर सामना अनिर्णित राहू शकतो. पण इंग्लंडचा संघ भारताला लवकरात लवकर 'ऑल आऊट' करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी शक्य असलेले सारेच पर्याय वापरले जात असतानाच, इंग्लिश गोलंदाज ब्रायडन कार्सवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स वादात सापडला. कार्सवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. संपूर्ण प्रकरण भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील आहे. १२ व्या षटकात शुभमन गिलने कार्सच्या सलग दोन चेंडूंवर दोन चौकार मारले. यानंतर, ब्रायडन कार्सने जाणूनबुजून त्याच्या शूजने चेंडूची शाईन असलेला चमकदार भाग पायाखाली दाबला. खेळाडू नेहमी चेंडू अडवताना जसा पायाने अडवतात, तसा त्याचा प्रयत्न नव्हता. उलट, त्याने चेंडूचा चमकदार भाग खराब करण्याच्या हेतुनेच चेंडून शूजच्या खालच्या खिळ्यांनी (नेल्स) दाबून तो घासण्याचा प्रयत्न केला. पाहा व्हिडीओ-
चेंडू स्विंग होत नसल्याने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना चेंडूकडून फारशी मदत मिळत नव्हती. म्हणूनच कदाचित ब्रायडन कार्सने अशा प्रकारे चेंडूशी छेडछाड करायचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याची एक बाजू खराब होईल आणि चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागेल, असा चाहत्यांचा अंदाज आहे. कॅमेराने हे दृष्य टिपले आणि लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान पॉन्टिंगनेही यावर आक्षेप नोंदवला. आता ब्रायडन कार्सवर या बाबतीत काही कारवाई होते की नाही याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.