Concussion Sub Controversy, Ind vs Eng 4th T20 : इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात भारताने धमाकेदार विजय मिळवला. भारताकडून शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी अर्धशतके ठोकत संघाला १८१ धावा करून दिल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १६६ धावांतच आटोपला. रवी बिश्नोई आणि हर्षित राणा या दोघांनी ३-३ बळी घेतले. महत्त्वाची बाब म्हणजे हर्षित राणा सामन्याच्या सुरुवातीला संघात नव्हता. सामन्याच्या मध्यांतरात शिवम दुबेला डोक्याला दुखापत झाल्याने बाहेर बसवण्यात आले आणि त्याच्या जागी हर्षित राणाला संघात घेतले गेले. या समावेश कन्कशन-सब या नियमांतर्गत करण्यात आला. पण आता यावरून वाद होऊ लागले आहेत. इंग्लंडचा जोस बटलर यानेही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कन्कशन-सबच्या खेळाडूला मंजुरी कोण देतं?
भारतीय फलंदाजीच्या वेळी शेवटच्या षटकात शिवम दुबेच्या हेल्मेटला चेंडू लागला. त्यानंतर फिजीओने त्याला दोन चेंडू खेळायची परवानगी दिली. पण नंतर त्याला फिल्डिंगसाठी तो फिट नसल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत कन्कशन सब या निमयांतर्गत भारताकडून शिवम दुबेसारखेच गुणधर्म असलेला खेळाडू देणे आवश्यक होते. भारताने हर्षित राणाचे नाव पुढे गेले. महत्त्वाची बाब म्हणजे, कन्कशन सब म्हणून कोणत्या खेळाडूला मंजुरी द्यायची हे अधिकार कुठल्याही संघाला नसतात. संघ केवळ नाव पुढे करू शकते, त्या खेळाडूला मंजुरी द्यायची की नाही याचा निर्णय सामनाधिकारी म्हणजेच मॅच रेफरी घेतात. त्यानुसार भारतीय संघाने हर्षित राणाचे नाव पुढे केले. सामन्याचे रेफरी असलेले भारताचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ याने या पर्यायी खेळाडूला मंजुरी दिली. असे निर्णय घेण्याचे अधिकार सामनाधिकाऱ्याचेच असतात. त्यानुसारच हा निर्णयही घेतला गेला.
सामन्यात नेमकं काय घडलं?
भारत-इंग्लंड सामन्यातील भारताच्या डावाच्या शेवटच्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनचा चेंडू फलंदाज शिवम दुबेच्या हेल्मेटला लागला. चेंडू हेल्मेटला लागताच टीम इंडियाचे फिजिओ मैदानात आले आणि त्यांनी दुबेची तपासणी केली. दुबे तंदुरुस्त आहे की नाही आणि पुढे खेळू शकतो का हे त्याने पाहिले. डावात फक्त २ चेंडू बाकी होते त्यामुळे दुबे खेळत राहिला. पण जेव्हा टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण सुरू झाले, तेव्हा दुबेच्या जागी हर्षित राणा पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात आला आणि त्यानंतर बीसीसीआयने अपडेट दिली की हर्षित हा कन्कशन-सब म्हणून संघात घेतला आहे.