IND vs ENG 3rd Test Shubman Gill Was Furious At The English Opening Pair : लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडच्या संघाने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली आहे. भारतीय संघाचा पहिला डावही इंग्लंडप्रमाणे ३८७ धावांवरच आटोपला. इंग्लंडच्या ऐतिहासिक मैदानात पहिल्यांदाच कसोटीत दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावा केल्याचे पाहायला मिळाला. पण त्यानंतर इंग्लंडच्या संघाने डावाला सुरुवात केल्यावर दिवसाअखेरच्या शेवटच्या षटकात मैदानात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. इंग्लंडच्या सलामीवारांवर शुबमन गिल भडकल्याचे पाहायला मिळाले.
...अन् शुबमन गिल दोन्ही सलामीवीरांना भिडला
भारतीय संघाचा डाव संपल्यावर इंग्लंडच्या संघाने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. पण दिवसाअखेर अधिक षटके खेळणं टाळण्यासाठी सलामीवीरांनी बुमराहच्या पहिल्या षटकात 'टाइम पास'चा डाव खेळला. यावर भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलनं आधी नाराजी व्यक्त केली. पण तरीही इंग्लंडच्या बॅटर्संनी आपला तोरा कायम ठेवला. भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल तावातावाने झॅक क्राउलीकडे जाऊन त्याला सुनावताना दिसले. त्यानंतर शुबमन गिलनं नॉन स्ट्राइकवर असलेल्या बेन डकेट याला खुन्नस दिली. त्याच्या नजरेला नजर भिडवत भारतीय कर्णधाराने राग व्यक्त केला. इंग्लंडच्या सलामीवीरांनी अधिक षटकांचा खेळ होऊ नये, यासाठी खेळलेल्या डावामुळे तिसऱ्या दिवसाअखेर वातावरण चांगलेच तापले होते. सोशल मीडियावर मैदानातील दृश्याचे फोटो अन् व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
शेवटी त्यांच्या मनासारखं झालं
दुसऱ्या डावाची सुरुवात झाल्यावर इंग्लंडच्या सलामीवीरांनी जो डाव खेळला तो शेवटी यशस्वी ठरला. जसप्रीत बुमराहच्या एका षटकानंतरच मैदानातील पंचांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. खेळ थांबला त्यावेळी झॅक क्रॉउलीनं पहिले षटक खेळून २ धावा काढल्या होत्या. दुसऱ्या बाजूला बेन डकेट चेंडू न खेळता नाबाद परतला. तिसऱ्या दिवसाअखेर नाबाद तंबूत परतण्याचा डाव यशस्वी ठरल्यावर इंग्लंडची सलामी जोडी चौथ्या दिवशी किती काळ टिकणार ते पाहण्याजोगे असेल.