Join us

विराट कोहलीला फॉर्म मिळवण्याची अखेरची संधी; भारत-इंग्लंड शेवटचा वनडे सामना आज

Virat Kohli, IND vs ENG 3rd ODI : भारतीय दिग्गज विराट कोहलीची बॅट अद्याप शांतच आहे. धावा काढण्यासाठी तो धडपडत असला तरी अपयश पिच्छा पुरवत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 08:39 IST

Open in App

Virat Kohli, IND vs ENG 3rd ODI : अहमदाबाद : दिग्गज विराट कोहलीची बॅट अद्याप शांतच आहे. धावा काढण्यासाठी तो धडपडत असला तरी अपयश पिच्छा पुरवत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी फॉर्ममध्ये येण्यासाठी बुधवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळला जाणारा एकदिवसीय सामना कोहलीसाठी अखेरची संधी असणार आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने प्रत्येकी ४-४ गडी राखून जिंकणाऱ्या भारतीय संघाचे लक्ष्य पाहूण्यांना हरवून 'क्लीन स्वीप' नोंदविण्याचे असेल, रोहितच्या संघाने १९ नोव्हेंबर २०२३ ला याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना एकतर्फी गमावला होता.

सध्याच्या मालिकेत रोहितने दुसऱ्या सामन्यात ९० चेंडूंत ११९ धावा ठोकून फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. रोहितकडून प्रेरणा घेत मोठी खेळी करण्याचे आव्हान विराटपुढे आहे, विराट कोहली सध्या खेळपट्टीवरदेखील अधिक वेळ स्थिरावताना दिसत नाही. त्याला सूर गवसल्यास तिसऱ्या सामन्यात तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४००० धावांचा पल्ला गाठू शकतो. त्यासाठी त्याला केवळ ८९ धावांची गरज आहे.

लोकेश राहुलचे काय?

लोकेश राहुलच्या फॉर्मचीदेखील संघ व्यवस्थापनाला काळजी वाटते. भारताने मालिकेत प्रत्येक विभागात सरस कामगिरी केली. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्यामुळे गोलंदाजी भक्कम झाली.

जसप्रीत बुमराह बाहेर

बुमराहच्या अनुपस्थितीत शमीचे दाखल होणे हा मोठा दिलासा ठरावा. आधी ठरल्यानुसार बुमराहला अहमदाबादच्या सामन्यात खेळायला हवे होते. मात्र, तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. ताजेतवाने राहून सामना खेळण्याच्या हेतूपोटी दोन्ही संघांनी मंगळवारी सराव केला नाही.

विजयाची भिस्त फलंदाजांवर

  • जोस बटलरच्या संघाला १ चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मनोबल उंचाविण्यासाठी अखेरचा एकदिवसीय सामना जिंकणे गरजेचे आहे. जेकब बेथेलच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याने तो बाहेर होताच चॅम्पियन्सपूर्व इंग्लंडची चिंता वाढली.
  • नागपूर आणि कटकमध्ये फिल सॉल्ट-बेन डकेट जोडीने उत्कृष्ट सलामी दिल्यानंतरही मोठी खेळी करण्यात दोघांनाही अपयश आले होते. ज्यो रूटने प्रभावी फलंदाजी केली; मात्र दुसन्या टोकाहून त्याला साथ मिळताना दिसत नाही.
  • फिरकीपटू आदिल राशिद याने मात्र भारतीय खेळपट्ट्यांचा पुरेपूर लाभ घेतला. इंग्लंडला विजयी शेवट करायचा झाल्यास त्यांच्या फलंदाजांना सर्वोत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल.

सामना : दुपारी १:३० पासूनथेट प्रेक्षपण : स्टार स्पोर्टस्लाइव्ह स्ट्रीमिंग : जिओ सिनेमा

टॅग्स :विराट कोहलीभारत विरूद्ध इंग्लंड २०२५चॅम्पियन्स ट्रॉफीभारतीय क्रिकेट संघ