Rishabh Pant ICC, IND vs ENG 1st Test: टीम इंडियाचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने इंग्लंडविरूद्ध अप्रतिम फलंदाजी केली. IPL मध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतर पंतने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शतके ठोकली. ऋषभ पंतने पहिल्या डावात १३४ आणि दुसऱ्या डावात ११८ धावा केल्या. या डबल धमाक्यानंतरही ऋषभ पंतला ICC कडून मोठा दणका बसला. लीड्स कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावून ऋषभ पंतने इतिहास रचला. पण तो इतिहास रचताना त्याने एक चूक केली, ज्यामुळे त्याला ओरडा खावा लागला.
नेमके काय घडले?
ऋषभ पंतला ICCच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले. पंत लेव्हल १ अंतर्गत दोषी आढळला. त्यानंतर मॅच रेफरीने त्याला फटकारले आणि समज देऊन सोडून दिले. त्याच्यावर पुढील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ICCने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये असे सांगण्यात आले की पंत कलम २.८ अंतर्गत दोषी आढळले आहे, जे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचांच्या निर्णयाचा निषेध किंवा आक्षेप घेण्याशी संबंधित आहे. या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पंतच्या खात्यात १ डिमेरिट पॉइंट देखील जोडण्यात आला आहे.
पंतने काय चूक केली?
पंतने केलेली चूक ही लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाची आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ६१व्या षटकात, पंचांनी चेंडूचा आकार तपासल्यानंतर चेंडू बदलण्यास नकार दिला. यावर पंतने पंचांसमोर नाराजी व्यक्त केली, तसेच तेथेच चेंडू जमिनीवर फेकून आपला निषेध व्यक्त केला. या चुकीमुळे पंतला फटकारण्यात आले. ICCच्या प्रेस रिलीजनुसार, ऋषभ पंतने त्या प्रकरणात मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांच्याकडे आपली चूक मान्य केली. मैदानावरील पंच पॉल रायफल आणि ख्रिस जाफनी यांनी पंतच्या निषेधाबद्दल मॅच रेफरीकडे तक्रार केली होती. त्यांच्याशिवाय थर्ड अंपायर शरफुदुल्लाह आणि फोर्थ अंपायर माइक बर्न्स यांनीही आरोप केले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली.