Join us  

IND vs ENG Live: 'क्लास' राहुल चमकला पण शतकाला मुकला; स्टोक्सनं सुटकेचा निश्वास सोडला

IND vs ENG 1st Test Match Live Updates In Marathi: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 1:32 PM

Open in App

IND vs ENG 1st Test Match Live Updates । हैदराबाद: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सलामीचा सामना खेळवला जात आहे. पहिल्या दिवसअखेर मजबूत स्थितीत राहिल्याने यजमान भारताने दुसऱ्या दिवशी देखील साजेशी कामगिरी केली. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलला दुसऱ्या दिवशी काही खास करता आले नाही. जैस्वाल एक चौकार मारून तंबूत परतला. मग श्रेयस अय्यरने डाव सांभाळला पण त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. अय्यर बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने मोर्चा सांभाळला अन् ८६ धावांची अप्रतिम खेळी केली.

शतकाकडे कूच करत असलेल्या राहुलच्या मार्गात टॉम हार्टली आडवा आला. खरं तर हार्टलीची या सामन्यात आतापर्यंत चांगलीच धुलाई झाली. पण लोकेश राहुल त्याच्या जाळ्यात फसला अन् रेहान अहमदच्या हातात झेलबाद झाला. राहुलने २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने १२३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. राहुलचा झेल हवेत होता तेव्हा इंग्लिश संघाचा कर्णधार बेन स्टोक्सचे हावभाव पाहण्याजोगे होते. झेल घेताच स्टोक्सने सुटकेचा निश्वास सोडला. 

भारताची सांघिक खेळी भारताने पहिल्या दिवसअखेर १९ षटकांत १ बाद ११९ धावा केल्या होत्या. सलामीवीर यशस्वी जैस्वालने आजही त्याच्या शैलीप्रमाणे स्फोटक खेळी करण्याचा प्रयत्न केला. पण चौकार मारून त्याला तंबूत परतावे लागले. त्याने १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७४ चेंडूत ८० धावांची अप्रतिम खेळी केली. भारताकडून यशस्वी जैस्वाल (८०), रोहित शर्मा (२४), शुबमन गिल (२३) आणि श्रेयस अय्यरने (३५) धावा केल्या. 

दरम्यान, गुरूवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. सलामीचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. हैदराबाद कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव अवघ्या २४६ धावांवर आटोपला. इंग्लिश संघाकडून कर्णधार बेन स्टोक्सने दमदार खेळी केली पण त्यालाही सन्मानजनक धावसंख्या उभारता आली नाही. पाहुण्या संघाने आपल्या पहिल्या डावात ६४.३ षटकांत सर्वबाद २४६ धावा केल्या. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारून मजबूत आघाडी घेण्याची सुवर्णसंधी यजमान भारताकडे आहे.

पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, केएस भरत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह. 

पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), जोनी बेअरस्टो, झॅक क्रॅव्ली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लिच. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडबेन स्टोक्सभारतीय क्रिकेट संघश्रेयस अय्यर