Coincidence after 5055 Days, IND vs ENG Test Series: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या IPLचा हंगाम सुरू आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या पहिल्या कसोटी सामन्याच्यावेळी असे काही घडणारे आहे, जे तब्बल ५,०५५ दिवसांपूर्वी घडलेले होते. ५,०५५ हे खूप मोठे अंतर आहे. पण इतक्या दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये काहीतरी वेगळे घडणार आहे. ५०५५ दिवसांपूर्वी जे दिसले ते भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर पुन्हा एकदा दिसून येणार आहे. जाणून घेऊया त्याबद्दल...
५०५५ दिवसांपूर्वी म्हणजे १८ ऑगस्ट २०११ रोजी...
सर्वप्रथम, ५०५५ दिवसांपूर्वी काय घडले ते समजून घ्या. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. मालिकेतील चौथी कसोटी १८ ऑगस्ट २०११ रोजी ओव्हल मैदानावर खेळली जात होती. ती शेवटची कसोटी होती ज्यामध्ये रोहित, विराट किंवा अश्विन हे तिघेही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हते. भारताने ती कसोटी त्या तीन खेळाडूंशिवाय खेळली, जी इंग्लंडने एक डाव आणि ८ धावांनी जिंकली.
५०५५ दिवसांनंतर म्हणजे २० जून २०२५ रोजी...
आता १४ वर्षांनंतर म्हणजे २०२५ मध्ये पुन्हा तेच दृश्य पाहायला मिळणार आहे. यावेळीही टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असेल, जिथे २० जून २०२५ रोजी पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी हेडिंग्लेच्या मैदानावर उतरेल. ५०५५ नंतर पुन्हा एकदा रोहित, विराट किंवा अश्विन हे तिघेही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसतील. हे तिन्ही भारतीय खेळाडू आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. मधल्या काळात इंग्लंडमध्ये जेवढ्या कसोटी खेळल्या गेल्या, त्यात या तिघांपैकी एक खेळाडू नेहमी प्लेइंग इलेव्हनचा भाग असायचा.
एकाच संघाविरुद्ध पदार्पण आणि निवृत्ती...
रोहित, विराट आणि अश्विनमध्ये काही गोष्टी समान आहेत. प्रथम, या तिन्ही खेळाडूंनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. आणि या तिन्ही खेळाडूंनी निवृत्तीपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. तिघांनीही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्यांचा शेवटचा सामना खेळला.