Join us

IND vs BAN : शाकिब अल हसनचा मोठा निर्णय! कानपूर कसोटीपूर्वी निवृत्तीची घोषणा, म्हणाला...

शाकिब अल हसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 14:17 IST

Open in App

shakib al hasan news : बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शाकिबने सांगितले की, त्याची शेवटची कसोटी मीरपूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी तो माध्यमांशी बोलत होता. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शाकिबला काही खास कामगिरी करता आली नाही. बांगलादेशच्या या अनुभवी खेळाडूने पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात ३२ आणि दुसऱ्या डावात अवघ्या २५ धावा केल्या. याशिवाय या सामन्यात त्याला एकही बळी घेता आला नाही.

बांगलादेशचा हा स्टार अष्टपैलू खेळाडू मैदानावर आणि मैदानाबाहेर वादांमुळे चर्चेत असतो. या वर्षी एप्रिलमध्ये त्याची ग्राउंड स्टाफसोबत बाचाबाची झाली होती. त्याचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि मारहाण करण्याची धमकीही दिली होती. याशिवाय तो मैदानावर विरोधी संघातील खेळाडू आणि पंचांशीही अनेकदा भांडला आहे. वन डे विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शाकिबचा अँजेलो मॅथ्यूजसोबत वाद झाला होता. 

दरम्यान, शाकिब सध्या भारत दौऱ्यावर असून, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा भाग आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत खेळल्यानंतर शाकिब कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती होईल. शाकिब आपला शेवटचा कसोटी सामना मीरपूरमध्ये खेळणार आहे. मात्र, शाकिबसाठी अडचण अशी आहे की, बांगलादेशमध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत काही अडचण निर्माण झाली तर तो आपल्या देशात शेवटचा कसोटी सामना खेळू शकणार नाही.

बांगलादेशातील सत्तापालटानंतर शाकिब अल हसनवर हत्येचा आरोप झाला होता, त्यामुळे तो आपल्या देशात परतला नाही. पण, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शाकिबला आश्वासन दिले की बांगलादेशमध्ये त्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि तो येथे खेळू शकतो, जे काही होईल ते कायद्याच्या कक्षेत असेल.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेश