Join us

IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण

ind vs ban live : सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 13:40 IST

Open in App

IND vs BAN Live Match Updates । चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजीचा प्रमुख चेहरा म्हणजे जसप्रीत बुमराह. सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. चेन्नईमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करत चार बळी घेत बांगलादेशला बॅकफूटवर आणले. यासह बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० बळी पूर्ण केले आणि अशी कामगिरी करणारा तो भारताचा दहावा गोलंदाज ठरला.

बुमराहच्या शानदार गोलंदाजीमुळे बांगलादेशचा पहिला डाव १४९धावांत आटोपला आणि भारताने २२७ धावांची आघाडी घेतली. बुमराहच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागला नाही. बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक करताना बांगलादेशचा खेळाडू तमीम इक्बाल म्हणाला की, बुमराहकडे खूप कौशल्य आहे, परंतु तो बुद्धीचा वापर चांगल्या प्रकारे करतो त्यामुळे त्याला अधिक यश मिळते.

जसप्रीत बुमराह एक अप्रतिम गोलंदाज आहे. त्याच्याकडे चांगली बुद्धी आहे. तसे पाहिल्यास सर्वांकडेच कौशल्य असते, पण योग्य प्रकारे बुद्धीचा वापर केल्याशिवाय हाती काय लागत नाही. जर तुम्ही डोक्याचा वापर केला नाही तर बुमराहसारखे यशस्वी होऊ शकणार नाही. त्यामुळे हे दोन्ही संयोग घातक आहेत आणि जग तेच पाहत आहे. बुमराह अप्रतिम आहे. केवळ भारतातच लोक त्याच्या कृतीची कॉपी करत नाहीत तर जगभरात हे घडत आहे. बुमराहचा जागतिक क्रिकेटवर असा प्रभाव आहे, असेही तमीम इक्बालने सांगितले.

दरम्यान, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी फलंदाजीत कमाल केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने घातक मारा करत बांगलादेशला सळो की पळो करुन सोडले. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी सुरुवातीपासूनच दबाव टाकला. बांगलादेशचा संघ अवघ्या १४९ धावांत गारद झाला अन् भारताला २२७ धावांची आघाडी मिळाली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार बळी घेतले, तर मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशजसप्रित बुमराह