IND vs BAN : २०२२ हे वर्ष भारतीय संघासाठी निराशाजनक होत चालले आहे, कारण बुधवारी बांगलादेशने मीरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर येथे दुसऱ्या वन डे सामन्यात ५ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका जिंकली. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका गमावण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०१५ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर भारत पराभूत झाला होता. गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धची मालिकाही गमावल्यानंतर वनडे मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे.
भारताची २०२२ मधील निराशाजनक कामगिरी
- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत हार
- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत पराभव
- इंग्लंडमध्ये झालेल्या पाचव्या कसोटीत पराभव
- आशिया चषक स्पर्धेची फायनल गाठण्यात अपयश
- ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हार
- न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत हार
माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने भारताच्या लाजिरवाण्या पराभवावर शाल जोडीचा टोमणा हाणला. सेहवागने भारताच्या खराब कामगिरीची क्रिप्टो चलनाच्या घसरत्या किमतीशी तुलना करून मजेशीर ट्विट केले. भारताच्या पराभवानंतर सेहवागने ट्विटरवर लिहिले, "क्रिप्टो से भी तेज गिर रही है अपना परफॉर्मन्स यार. उठण्याची गरज आहे - जागे व्हा."
२७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे ६ फलंदाज १८९ धावांवर माघारी परतले होते आणि विजयासाठी त्यांना ११.४ षटकांत ८३ धावा करायच्या होत्या. दीपक चहर फलंदाजीला आला, सोबत शार्दूल ठाकूर होता. शार्दूल ७ धावांवर बाद झाला आणि भारताला विजयासाठी ४२ चेंडूंत ६४ धावा करायच्या होत्या. अशात रोहित मैदानावर आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
भारताला ६ चेंडूंत २० धावा करायच्या होत्या. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर रोहितने सलग दोन चौकार खेचले. त्यानंतर एक चेंडू निर्धाव गेल्यानंतर खणखणीत षटकार खेचून रोहितने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. एक चेंडूंत ६ धावा हव्या असताना रोहितचा फटका चूकला अन् बांगलादेशने ५ धावांनी सामना जिंकला. रोहितने २८ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. भारताला ९ बाद २६६ धावाच करता आल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"