Join us

तीन वनडे, तितक्याच सामन्यांची टी-२० मालिका, टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याचं वेळापत्रक आलं

इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-२० मालिका खेळायला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:34 IST

Open in App

आयपीएल २०२५ नंतर भारतीय क्रिकेट संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. नुकतेच भारतीय नियामक क्रिकेट मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारताच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. या दौऱ्यात भारत बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर भारताची ही पहिलीच व्हाईट बॉल मालिका असेल. विशेष म्हणजे, भारतीय संघ पहिल्यांदाच बांगलादेशात टी-२० मालिका खेळणार आहे.

बांगलादेश दौऱ्यावर भारताला प्रथम ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना १७ ऑगस्ट रोजी मीरपूर येथे खेळला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना २० ऑगस्ट रोजी मीरपूर येथे खेळला जाईल. त्यानंतर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २३ ऑगस्ट रोजी चितगाव येथे खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना २६ ऑगस्टला खेळला जाईल. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २९ ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट रोजी मीरपूर येथे खेळला जाईल.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रकपहिला एकदिवसीय सामना- १७ ऑगस्ट (मिरपूर)दुसरा एकदिवसीय सामना - २० ऑगस्ट (मिरपूर)तिसरा एकदिवसीय सामना- २३ ऑगस्ट (चट्टोग्राम)

टी-२० मालिकेचे वेळापत्रकपहिला टी२० सामना - २६ ऑगस्ट (चट्टोग्राम)दुसरा टी२० सामना- २९ ऑगस्ट (मिरपूर)तिसरा टी२० सामना- ३१ ऑगस्ट (मिरपूर)

दरम्यान, २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळली जाणारी तीन सामन्यांची मालिका अत्यंत महत्त्वाची असेल.  या मालिकेपासून आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या तयारीला सुरुवात होईल. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली खेळवली जाईल, जी पुढच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेश